– अभिनेत्री दीप्ति नवल

ऐंशीच्या दशकात माझे अनेक चित्रपट गाजले. पण काहींच्या मते मी ‘स्वीट गर्ल नेक्स्ट डोअर’ इमेजमध्ये जखडली गेले आणि त्यामुळे ‘टिपिकल कमर्शिअल स्टार अ‍ॅक्ट्रेस’च्या भूमिका माझ्यापासून दूर राहिल्या. मला वाटतं, की कारकिर्दीची सुरुवातीची ४ ते ५ वर्षं मी ‘चश्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘साथ साथ’, ‘किसी से न कहना’, ‘रंग बिरंगी’सारख्या चित्रपटांतून माझी अशी प्रतिमा दृढ होत होती. पण मला त्याची जाणीव झाली त्यातून बाहेर पडण्याचा निकरानं प्रयत्न केला. मला स्वतःला ‘इंटेन्स’, गंभीर भूमिका करायच्या होत्या. पण हा बदल सोपा नव्हता. अशा ‘गर्ल नेक्स्ट डोअर’वाल्या भूमिकांना मी नकार देत राहिले आणि इंटेन्स भूमिका मिळेपर्यंत एक खंड पडला. त्याला माझा नाईलाज झाला. ‘चश्मेबद्दूर’, ‘कथा’ या माझ्या सुपरहिट झालेल्या भूमिका आहेत, पण ‘अनकही’, ‘मैं जिन्दा हूँ’, ‘यह इश्क नहीं आसाँ’, ‘दीदी’, ‘शक्ति’ अशा चित्रपटांतून माझ्यातली संवेदनशील अभिनेत्री समोर आली. ती इमेज मला भावते.

‘मेमरीज इन मार्च’ हा माझा आवडता चित्रपट. त्याचं संपूर्ण चित्रीकरण लंडनला झालं. यातली माझी व्यक्तिरेखा माझी अत्यंत आवडीची आहे. अर्थात कधीतरी खंत वाटतेच, की माझ्यातली संपूर्ण क्षमता चित्रपटासाठी वापरली गेली नाही! कथा, कविता, प्रवास वर्णन लिहिणे, प्रवासाला जाणे माझ्या व्यक्तिमत्वाचा दुसरा भाग जो मला अतिशय प्रिय आहे, माझा सर्वात मोठा विरंगुळा आहे. हल्ली दिग्दर्शनापासून मी दूर राहते, काहीसा धसका घेतला आहे मी दिग्दर्शन करण्याचा असं म्हणेन! ‘दो पैंसों की धूप, चार आने की बारिश’ हा चित्रपट मी दिग्दर्शित केला, पण तो विकला गेला नाही. एक महत्त्वपूर्ण, संवेदनशील विषयावरचा हा चित्रपट ७-८ वर्षं डब्यात बंद पडून होता, ज्यात माझ्या भावना गुंतल्या होत्या. हा विषय समाजासमोर यावा असं मनापासून वाटत होतं! मी अनेकदा धडपड केली, नुकताच नेटफ्लिक्सनं हा चित्रपट घेतला, तो नेटफ्लिक्सवर पाहता येतो. एका विषयाला वाचा फुटली आणि तो एका महत्त्वाच्या माध्यमामार्फत प्रेक्षकांसमोर आला, याचं समाधान मला मिळालं.

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

हेही वाचा – नात्यातले गैरसमज धुमसत ठेवणं घातकच!

मला नव्या पिढीसोबत काम करणं कसं वाटतं, असं मला नेहमी विचारतात. मी जेव्हा ऐंशी आणि नव्वदच्या दशकात काम करत असे, तेव्हा नसिरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि फारुख शेख हे तीन कलाकार केवळ ठरल्या वेळेत येत असं पाहायला मिळायचं. समस्त ‘कमर्शिअल स्टार्स’ना कधीही वेळेवर सेटवर येणं ठाऊक नसे. त्यामुळे त्यांच्यासाठी तासंतास वाट पाहणं मोठं त्रासिक होतं. सकाळी नऊची शिफ्ट असली, तरी काही मंडळी दुपारी ३ किंवा ४ वाजता येत असत! सहकलाकारांच्या वेळेची, त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाची त्यांना पर्वा नव्हती. हल्लीची पिढी मात्र अतिशय ‘प्रोफेशनल’ वागते. त्यांच्याकडे कदाचित भावनिक गुंतवणूक नसेल, पण स्वतःच्या करिअरकडे, सहकलाकारंच्या वेळेकडे ही पिढी गांभीर्यानं पाहते असं मला दिसतं. नुकताच माझा इंग्रजी चित्रपट ‘मदर टेरेसा अँड मी’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची नायिका नव्या पिढीतली अभिनेत्री बनिता ‘युके’मध्ये राहणारी मॉडेल-अभिनेत्री आहे. पण तिच्यात भारतीय मूल्यं आहेत. तिच्यातला ‘प्रोफेशनल अप्रोच’ मला स्तिमित करतो.

‘मदर टेरेसा अँड मी’ या चित्रपटाची साधी कथा मला आवडली. तिची उत्कंठावर्धक मांडणी केली आहे. तरुण पिढीत अनेकांचं भरकटलेलं आयुष्य, योग्य मार्गदर्शक न मिळाल्यानं त्यांचा होणारा कोंडमारा यात दिसतो. ही आजच्या पिढीतली गोष्ट आहे आणि मदर टेरेसा ही व्यक्तिरेखा प्रतिकात्मक आहे. चित्रपटाची नायिका कविताची (अभिनेत्री बनिता संधू) प्रेमप्रकरणात फसगत होते. कुणाचा आधार नसल्यानं ती नैराश्यात जाते आणि एक वयस्क स्त्रीचा – जिला ती नानी म्हणते तिचा आधार तिला गवसतो. ही नानीची भूमिका मी केली आहे. ही स्त्री कविताला जगण्याचं बळ देते. कमल मुसळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘ए कंट्री कॉल्ड चाइल्डहूड मेमोरीज’ हे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं माझं पुस्तक माझ्या समृद्ध बालपणाच्या आठवणी सांगतं. माझा जन्म, माझं बालपण, शालेय जीवन, जीवनातला १५ वर्षांपेक्षा अधिक काळ अमृतसरमध्ये गेला आहे. माझी भावंडं (एक भाऊ आणि एक बहीण), उच्चविद्याविभूषित आई-वडील यांनी माझं बालपण व्यापून गेलं होतं. माझ्या जडणघडणीत माझ्या आई-वडिलांचं सर्वोच्च योगदान आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेरेषेवरचं अमृतसर शहर अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. इथला निसर्ग मनावर खोलवर आपला ठसा उमटवतो. माझ्या पुस्तकात या माझ्या शहराविषयीदेखील मी भरभरून लिहिलंय. अमृतसर आणि इथून जवळ असणाऱ्या हिमालयाच्या सानिध्यात मी वाढले. शालेय जीवनातील प्रत्येक शनिवार-रविवार-सुट्ट्या आम्ही सहकुटुंब आमच्या गाडीनं शिमला, कुलू-मनाली अशा स्थळांवर जात असू. आई जवळच्या खडकांवर बसून चित्रं काढत असे. आम्ही भावंडं आणि वडील बर्फात खेळायचो. हिमालयातून वाहणाऱ्या झऱ्यांत मजा करायचो.

हेही वाचा – आहारवेद: प्रथिनांचे भांडार शेंगदाणे

अमृतसरमध्ये आमच्या राहत्या प्रशस्त घरात आम्हांला तोफा, बंदुकीच्या फैरींचा आवाज येणं नित्याचं होतं. निसर्गाच्या समीप, अत्यंत साधेपणानं, परंतु समृद्ध असं माझं बालपण गेलं आणि आजची दीप्ती नवल घडत गेली. माझ्या बालविश्वाचा घेतलेला वेध, मनावर मोरपीस फिरवणाऱ्या रम्य आठवणी म्हणजे माझं हे पुस्तक. हे पुस्तक लिहिताना माझी ५ ते ६ वर्षे गेलीत. तरी मला आठवतील तशा आठवणी मी वेळ मिळेल तशा मांडून ठेवल्या होत्या! मी गेल्या ५-६ वर्षांत मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटांपासून दूर होते त्याचं हे मुख्य कारण होतं.

सध्या मी ‘पवन अँड पूजा’, ‘मेड इन हेवन’, ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेब मालिकांमध्ये मी अलीकडे व्यग्र होते. ओटीटीवर काम करणं मला पुढेही आवडेल, पण त्यातही आव्हानात्मक भूमिका असणं गरजेचं आहे.

शब्दांकन – पूजा सामंत.
(samant.pooja@gmail.com)