scorecardresearch

आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पदार्थांमागील शास्त्र

आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाच्या काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत.

science food diwali science of panch mahabhut karanji chakli chiwda pohe anarse
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पदार्थांमागील शास्त्र (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत करंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

article about benefits of exercise
आरोग्याचे डोही : व्यायाम नव्हे; उत्सव!
information about ngo tuljai pratishthan bahuuddeshiy sanstha
सर्वकार्येषु सर्वदा : ‘नकोशीं’ना नवजीवन
Lucky Zodiac Sign
वयाच्या तिशीनंतर प्रचंड श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? शनिदेवाच्या कृपेने व्यवसायात मिळू शकतो भरपूर नफा
Why is sleeping under a tamarind tree considered scientifically forbidden?
चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोह्यांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाह्यांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून बनविलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पंच महाभूतांचे शास्त्र

मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोह्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले की त्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो. अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो.

दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.

harishpatankar@yahoo.co.in

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The science behind food that is prepared during diwali science of panch mahabhut dvr

First published on: 20-11-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×