केतकी जोशी

मस्त पाऊस पडतोय… तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या आवडत्या जागेवर बसून मस्त कॉफी किंवा चहाचे घुटके घेत आवडतं काम करताय. बहुतेक सगळ्याच जणींचं हे स्वप्नं आहे. बरोबर ना? हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं एक नवं वर्क कल्चर, कामाची नवी संकल्पना प्रत्यक्षात येत आहे- ‘लेझी गर्ल जॉब’ म्हणजे आळशी मुलगी ही संकल्पना सध्या सोशल मिडीयावर जाम ट्रेंडिंग आहे. लेझी गर्ल म्हणजे कामात आळशीपणा करणाऱ्या मुली असा याचा अर्थ नाही, तर थोड्या वेळेत स्मार्टपणे, आपलं आवडतं काम करून पैसे आणि समाधान देणारं काम करणं असा या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ आहे.

मे महिन्याच्या शेवटी २६ वर्षाच्या गॅब्रिएल जज हिनं एक टिकटॉक व्हिडिओ केला, ज्यातून ही कल्पना तिनं मांडली. अर्थातच सुरुवातीला याची खिल्ली उडवली गेली. आताही ‘लेझी गर्ल जॉब’वर टीका करणारे काही कमी नाहीत. पण तरीही या संकल्पनेची चर्चा मात्र खूप झाली. असं काय आहे या ‘लेझी गर्ल जॉब’मध्ये?

‘लेझी गर्ल जॉब’ म्हणजे जिथे तुम्ही दिवसाचा अगदी थोडा वेळ काम करूनही महिन्याला व्यवस्थित पैसे मिळवू शकता, (अगदी ७०-८० हजारही) आणि महत्त्वाचे हे काम तुम्ही ऑफिसला न जाता घरून किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणाहून करू शकता, असं जज हिचं म्हणणं होतं. अशी अनेक कामं आहेत जिथं तुम्ही कमी काम करूनही चांगले पैसे मिळवू शकता. याचा अर्थ कामात आळशीपणा करणं असा होत नाही. जे काम आहे ते वेळेतच पूर्ण करायचं, पण फक्त स्मार्टली करायचं असा याचा अर्थ. #lazygirljob हा हॅशटॅग भरपूर ट्रेंडिंगही होता. तिला १७ दशलक्षपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले. कामाचं रिफ्रेमिंग करणं… म्हणजे थोडक्यात त्याची पुन्हा आराखडा तयार करणं. प्रत्येकाची कामाची पद्धत, कामाचं वातावरण आणि गरजा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे जजच्या मते, ‘लेझी गर्ल जॉब’चा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. अर्थात ती या संकल्पनेची अगदी ठोस अशी व्याख्या करत नाही.

‘लेझी गर्ल जॉब’साठी चार निकष आहेत, असं तिला वाटतं. सुरक्षिततेची भावना (लांबलचक शिफ्ट्स नाही, कामाचे ठिकाण धोकादायक नाही, कठीण, खूप वेळ प्रवास करावा लागत नाही), रिमोट- किंवा हायब्रिड फ्रेंडली, म्हणजेच घरून किंवा ऑफिसमधून हवं तसं काम करता येतं, पुरेसा किंवा समाधानकारक पगार आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे काम आणि आयुष्य यांच्यातील योग्य तो समतोल, हे चार निकष ‘लेझी गर्ल जॉब’ची संकल्पना पुरेशी स्पष्ट करतात. थोडक्यात, कर्मचाऱ्यांना स्वत:ला प्राधान्य देण्यासाठी वेळ देणारे निरोगी वातावरण कामाच्या ठिकाणी असायला हवं यावर ‘लेझी गर्ल जॉब’चा भर आहे.

कामाचं क्षेत्र कोणतंही असो, प्रचंड काम, घरच्यांसाठी, छंदासाठी वेळ न मिळणं, हव्या त्या वेळी सुट्ट्या न मिळणं या गोष्टी होतातच. अर्थातच चिडचिड आणि विशेषत: महिलांची चिडचिड तर खूपच वाढते. सतत स्वत:ला सिद्ध करण्याच्या या स्पर्धेत कितीतरी जणी स्वत:ला हरवून बसतात. अशावेळेस वर्क लाईफ बॅलेन्स साधणारं काम केलं पाहिजे असा विचार हजारदा मनात येतो. ‘लेझी गर्ल जॉब’ ही तीच संकल्पना आहे. ऑफिस आणि कामाचं टेन्शन अगदी नगण्य असतं अशा पद्धतीनं काम करणं म्हणजेच ‘लेझी गर्ल जॉब’. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडव्याच लागतात, पण ऑफिसचं टेन्शन असेल तर त्याचा तब्येतीवर म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हेच टेन्शन न घेता छानपैकी आपल्याला हवं तसं काम करायचं आणि कामाचा, आयुष्याचा आनंद घ्यायचा हेच या संकल्पनेतून सांगण्याचा प्रयत्न तिनं केला आहे. नवीन जनरेशनचे अनेक टिकटॉक यूजर्स या नवीन ट्रेंडचं प्रमोशन करत आहेत. त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. मात्र आपल्याला करियरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर डेस्कला चिकटून बसण्याशिवाय, खूप वेळ काम केल्याशिवाय किंवा सुट्ट्या न घेता काम केल्याशिवाय पर्याय नाही असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी ही संकल्पना अजिबातच नाही. खरं तर ही संकल्पना अशा मानसिकतेलाच चॅलेंज करणारी आहे. अर्थात याला विरोधही होत आहे.

‘लेझी गर्ल जॉब’ ही संकल्पना सगळ्यांसाठी आहे का? तर कदाचित नाही. नॉन टेक्निकल कामं करणाऱ्या लोकांसाठी मात्र ही संकल्पना नक्कीच आहे. ज्यांचं काम करण्याचे तास अगदी ठरलेले नसतात त्यांनाही याचा उपयोग होऊ शकतो. कंटेट क्रिएटर्स, आर्टिस्ट अशांसारख्यांना तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. आपल्याकडे किमान ८ ते ९ तासांची ड्युटी असते. त्यात मुंबईसारख्या शहरात प्रवासाचा वेळ धरला तर किमान १२ तास तरी घराबाहेर जातात. लहान मुलं असणाऱ्यांना किंवा अन्य काही जबाबदाऱ्या असणाऱ्यांची अशा परिस्थितीत तारेवरची कसरत होते. पण ज्यांना आयुष्य आणि काम दोन्हीचा आनंद उपभोगायचा आहे, त्यांच्यासाठी ही ‘लेझी गर्ल जॉब’ची संकल्पना उत्तम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या आधीच्या पिढीनं अत्यंत कष्टानं मिळवलेल्या गोष्टी आपल्याला अधिक सोप्या मार्गानं मिळाल्या आहेत. आपल्या पुढच्या पिढीला त्या आणखी सहज मिळतील. त्यांचे कष्ट करण्याची पद्धत कदाचित वेगळी आणि अधिक स्मार्ट असेल. शेवटी आपण काम कशासाठी करतो, तर पैशांबरोबरच मिळणाऱ्या समाधानासाठी. तुम्हालाही असं स्मार्ट काम करायचं असेल, आयुष्यातल्या छोट्याछोट्या गोष्टींचा आणि त्याचबरोबर कामाचाही आनंद घ्यायचा असेल तर ‘लेझी गर्ल जॉब’चा विचार करायला हरकत नाही.