डॉ. शारदा महांडुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्कृतमध्ये कृष्णिनब तसेच कैटर्य, हिंदीमध्ये मीठानीम, इंग्रजीमध्ये करी लिव्हज, तर शास्त्रीय भाषेत मुर्रया कोएनिगी या नावांनी ओळखला जाणारा कढीपत्ता किंवा गोडिलब हा रुटेसी कुळातील आहे. कढीपत्त्याचे झाड मध्यम आकाराचे असते. हे झाड प्रत्येकाच्या परसबागेत आवश्यक आहे. कारण याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे घराजवळील वातावरण स्वच्छ, सुगंधी राहण्यास मदत होते. तसेच वातावरणातील जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो व आजार आपल्यापासून दूर राहतात. याच्या पानांमधून सुगंधी तेलही निघते.

औषधी गुणधर्म

कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्वही असते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो.

हेही वाचा- आईने कट रचला, बाबांनी आठ दिवस सलग..केरळच्या Lesbian तरुणीचा ‘हा’ अनुभव आणेल डोळ्यात पाणी

उपयोग

० आहारातील कढी, आमटी, पोहे यांची चव वाढविण्यासाठी कढीपत्त्याची पाने नेहमी उपयोगात आणावीत. ही पाने पाचक असल्यामुळे भूक वाढते व घेतलेला आहार पचण्यास मदत होते.
० कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.
० बालकांच्या पोटामध्ये जंत किंवा कृमी झाले असतील तर त्यांना कढीपत्त्याची पाने बारीक वाटून त्याचा कल्क तयार करावा व या कल्कामध्ये समप्रमाणात गूळ आणि मध एकत्र करून त्याची छोटी गोळी बनवावी व ही गोळी २-२ या प्रमाणात सकाळ-संध्याकाळ द्यावी. यामुळे पोटातील कृमी नाहीसे होतात.
० कढीपत्ता हा शीतल गुणधर्माचा असल्याने जुलाब व उलटी होत असेल व काही वेळा त्यातून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याची पाने पाण्यासोबत वाटून ते पाणी गाळून घ्यावे व १-१ चमचा या प्रमाणात २-३ तासांच्या अंतराने प्यावे. यामुळे उलटी कमी होऊन रक्तस्राव थांबतो.
० मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यायल्यास रक्त पडण्याचे थांबते.
० अपचन, अरुची, अग्निमांद्य (भूक कमी होणे) ही लक्षणे जाणवत असतील तर कढीपत्त्याची २-३ पाने चावून खावीत. यामुळे बेचव तोंडाला रुची निर्माण होऊन भूक लागल्याची जाणीव निर्माण होते.
० पोटात जर मुरडा येत असेल तर तो कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत.
० लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
० शरीरावर विषारी कीटकाच्या दंशाने सूज आलेली असेल तर कढीपत्त्याची पाने वाटून त्यावर त्याचा लेप द्यावा. यामुळे सूज उतरते.
० शरीरावर झालेली जखम भरून येत नसेल तसेच त्वचेवर पुरळ उठून खाज येत असेल तर कढीपत्त्याची पाने वाटून त्याचा कल्क शरीरावर चोळावा व जखमेवर लावावा.
० हिरडय़ा कमकुवत होऊन दात हलत असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क हिरडय़ांवर चोळावा यामुळे हिरडय़ांचे आरोग्य सुधारून दात मजबूत होतात.
० दात व जीभ अस्वच्छ राहिल्यामुळे तोंडास दुर्गंधी येत असेल तर कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे जिभेवरील साचलेला पांढरा थर दूर होतो, दात
स्वच्छ होतात व त्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.
० कढीपत्त्याच्या पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या विकारासाठी उदा. खाज सुटणे, डोळे कोरडे होणे इ. विकारांवर कढीपत्त्याच्या पानांचा रस काढून १-२ थेंब डोळ्यांत टाकावा. परंतु यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
० कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
० महिलांना मासिक पाळी नियमित येत नसेल तसेच रक्तस्राव कमी होत असेल, चेहऱ्यावर काळे वांग, मुरमे पुटकुळ्या येत असतील, केस गळणे, केसांत कोंडा होणे या तक्रारी असतील तर नियमितपणे कढीपत्त्याच्या पानांचा काढा २-२ चमचे सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
० कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने मधुमेह हा आजारही कमी होतो. नियमितपणे ही पाने खाल्ल्यास रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी होऊन ते योग्य प्रमाणात येते.
० तळपाय व टाचेला भेगा पडलेल्या असतील तर कढीपत्त्याच्या पानांचा कल्क,
टाच स्वच्छ धुऊन त्यात रात्री झोपताना भरावा. यामुळे टाचेच्या भेगा भरून येण्यास मदत होते.

हेही वाचा- चांगल्या केसांसाठी वाचा या टिप्स!

सावधानता

कढीपत्त्याची पाने स्वयंपाकात वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावीत. अनेक जण पोह्य़ामधील, आमटी, कढी अशा आहारातील पदार्थामधील कढीपत्ता वेचून बाहेर काढून टाकतात. उलट तो कढीपत्ता बारीक कुस्करून आहारीय पदार्थाबरोबर खाऊन टाकावा किंवा गृहिणीने कढीपत्त्याचे बारीक बारीक तुकडे करूनच ते पदार्थात वापरावेत म्हणजे खाल्ले जातील.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uses and benefits of curry leaves dpj
First published on: 15-12-2022 at 10:47 IST