आराधना जोशी

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. मुलांसाठी ही पर्वणीची गोष्ट आहे. रोजच्या रूटीनपासून जवळपास महिनाभराचा हा बदल मुलांना सुखावणारा आहे. दिवसभर धांगडधिंगा घाला, खेळा किंवा मस्ती करा अभ्यासाचा ससेमिरा मागे लागणार नाही याची जाणीव मुलांना असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तापमानात होणारी वाढ या सुट्टीवर परिणाम करणारी ठरली आहे. कोरडी हवा, अति तापमान, सतत येणारा घाम याचा मोठ्या व्यक्तींवर जितका परिणाम होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असतो.

उष्माघात, सन बर्न, घामोळे (पुरळ) येणे, उलट्या होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) होणे, अति घाम येणे, ताप, लघवीचा रंग बदलणे यासारखे आजार मुलांना लगेच होत असतात. अनेकदा अतिसाराचीही लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे या मोसमात मुलांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. पण ही काळजी नेमकी घ्यायची कशी याबद्दलच्या या काही टिप्स

१) मुलांना भरपूर द्रव पदार्थ द्या – उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे अनेकदा डीहायड्रेशनचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पाण्यासारखा उत्तम पर्याय नाही. मात्र अनेकदा नुसते पाणी पिण्यासाठी मुले नाखूश असतात किंवा सतत फ्रीजचे थंड पाणी पितात. अशावेळी पाण्याऐवजी फळांचे साखर विरहीत ताजे ज्यूस, घरी केलेले ताक, लस्सी, कोकम किंवा लिंबू सरबत, फळांचा वापर करून घरी बनवलेला मिल्कशेक अशा अनेक मार्गांनी मुलांना ठराविक अंतराने द्रव पदार्थ देत रहावेत. आवडत असेल तर पाण्याच्या बाटलीत लिंबाच्या काही फोडी, पुदीना, किंवा इतर फळे घालून त्या स्वादाचे पाणी मुलांसाठी तयार करा. साळीच्या लाह्या पाण्यात चार पाच तास भिजवून ठेवून मग त्याच पाण्यात लाह्या कुस्करून ते पाणी गाळून मुलांना देता येईल. हे पाणी सलाईन वॉटरसारखे काम करते. मुलांना आवडत असेल तर पाण्यात तुळशीचे बी किंवा सब्जा भिजवून किंवा फळांच्या रसात घालून पिण्यासाठी देता येईल. सब्जामुळे पोटाला थंडावा मिळतो. माठ वापरत असाल तर त्यात वाळ्याची छोटी पुरचुंडी घाला. वाळाही उन्हाळ्याची तल्लखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

२) हलका आहार द्या – पाण्याबरोबरच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात अति पाणी प्यायल्याने भूक मंदावते. अशावेळी हलका, कमी मसालेदार आहार मुलांसाठी सर्वोत्तम असतो. आहारात दही, ताक, दूध, पांढरा कांदा यांचा योग्य वापर करा. पचनाला हलके असणारे पदार्थ द्या. मुलांना आवडत असेल तर सकाळी एक चमचाभर गुलकंद अवश्य खायला द्या. फळे, सॅलड यांचा वापर वाढवा.

हे ही वाचा >> “बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!

३) बाहेर खेळण्याच्या वेळा ठरवा – सुट्टी लागली की अनेकदा इमारतीच्या आवारात मुलांचे खेळ रंगतात. त्यामुळे बाहेर किती कडक उन आहे याकडे दुर्लक्ष होतं आणि मुलं आजारी पडू शकतात. म्हणूनच मुलांनी कोणत्या वेळी खेळायला जायचं किंवा बाहेर फिरायला जायचं हे ठरवा. दुपारच्या कडक उन्हात घरात बसून खेळता येतील असे खेळ त्यांना खेळायला सांगा किंवा तुम्हीही त्यात सहभागी व्हा. नवनवीन खेळ शोधून काढायला त्यांना प्रोत्साहन द्या.

४) मुलांचे कपडे – या मोसमात मुलांसाठी कॉटनचे, सौम्य रंगाचे, अंग पूर्ण झाकलं जाईल, खूप घट्ट होणार नाहीत अशा कपड्यांची निवड करा. अनेकदा विविध समारंभांना जाताना जे कपडे मुलं घालतात त्यामुळे त्यांना खूप गरम तर होत नाही, घाम तर येत नाही किंवा अंगाला कपडा घासल्याने खाज, पुरळ तर येत नाही नं याची पालकांनी खात्री करून घेणं गरजेचं असतं.

५) विश्रांती – उन्हाळ्यात घामामुळे थकवा लगेच येतो. त्यामुळे मुलांसाठी पुरेशी विश्रांती आवश्यक असते. त्यांची झोप पूर्ण होते का याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं असतं. शिवाय दुपारच्या वेळी थोडावेळ झोप घेणं हा सुद्धा चांगला उपाय असतो. विश्रांतीच्या वेळी खोलीत थंडावा असेल, अंधार असेल याकडेही लक्ष द्यावे.

हे ही वाचा >> “बालसंगोपन रजा नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन”, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावरून फटकारले!

६) शरीराची स्वच्छता – उन्हाळ्यात घाम वाढतो आणि हा घाम त्वचेवर, कपड्याच्या थरांमध्ये अडकतो. यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होऊन त्वचेच्या समस्या उद्भवतात. यासाठी मुलांच्या आंघोळीच्या वेळी मान, पोट, कोपर, गुडघ्यामागील भाग, बोटांमधील भाग याकडे विशेष लक्ष द्यावे. अनेकदा केसांमध्ये घाम येतो आणि तो तिथेच वाळतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन, कोंडा अशा समस्या निर्माण होतात. यासाठी मुलांचे केस नियमितपणे केस धुवावेत. याशिवाय जर शक्य असेल तर दिवसातून दोनदा आंघोळ करायला सांगा. पण काही कारणांमुळे ते शक्य नसेल तर त्यांना थंड पाण्याने स्पंजिंग करा. जंतूपासून मुक्त होण्यासाठी कपडे रोजच्या रोज धुवा आणि उन्हात वाळवा. अनेकदा या काळात मुलांना गळवांचा त्रास होतो. जर गळू लहान असेल तर त्यावर चंदनाचा लेप लावता येतो. मात्र त्रास मोठा असेल तर लगेच वैद्यकीय उपचार करावेत.

हे ही वाचा >> भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

७) उन्हापासून संरक्षण – कडक उन्हात बाहेर पडण्याची वेळ आलीच तर टोपी, छत्री, सनकोट, गॉगल यांची मुलांनाही गरज असते हे लक्षात ठेवा. सनस्क्रिन लोशनचा वापर मुलांसाठी शक्यतो टाळावा कारण त्यात असणाऱ्या घटकांपैकी काहींची मुलांना ॲलर्जी असू शकते. त्याऐवजी ॲलोवेरा जेलचा वापर करता येऊ शकेल. उन्हाळ्यात अनेकदा नाकाचा घोणा फुटतो (नाकातून रक्त येतं). त्यावेळी लगेच एक कांदा हाताच्या बुक्कीने फोडून मुलांना हुंगवला तर रक्त थांबते. कडक उन्हामुळे अंगात कणकण वाटली तर पांढरा कांदा किसून त्याचा रस हातापायाच्या तळव्यांना आणि डोक्यावर चोळला तर ही कणकण निघून जाते.

या छोट्या छोट्या वाटणाऱ्या टिप्स खूप उपयुक्त आहेत. यांचा वापर केला तर हा उन्हाळा पालक आणि मुले दोघांच्याही दृष्टीने सुसह्य होईल.