डॉ. किशोर अतनूरकर
कमी वयाच्या मुलाशी लग्न केलं तर वैवाहिक जीवन सुरळीत राहील ना? लोक काय म्हणतील? मूलबाळ होण्यामध्ये काही अडचणी तर येणार नाहीत ना? असे प्रश्न विचारले जातात. काय आहे वास्तव?

लग्न जुळवत असताना मुलीच्या वयापेक्षा मुलगा जास्त वयाचा असला पाहिजे, अशी आपली परंपरिक मानसिक धारणा अनेक वर्षांपासून आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वयाने मोठ्या मुलीशी लग्न केल्यास मूल होण्यामध्ये काही अडचणी येतील का, हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो.

लग्न जुळवण्याचा पूर्वीच्या आणि आजच्या पद्धतीत खूप बदल जरी झाला असला तरी, आजही वधूच्या वयापेक्षा जास्त वयाचा वर ‘स्थळ’ म्हणून पहिला जाण्याच्या नियमामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. ‘अमुकचं ‘स्थळ’ खूप चांगलं आहे, आम्हाला सर्वार्थानं आवडलं आहे, पण काय करणार, मुलगा मुलीपेक्षा एक वर्षाने लहान आहे ना! मग ‘होकार’ कसा देणार?’ असंच अजूनही ऐकायला मिळतं. याचं कारण, लग्न जुळवताना मुला-मुलीच्या वयात किती वर्षांचं अंतर असायला पाहिजे? समजा वर्ष-दोन वर्षाने ती मोठी असेल तर वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतील का, याविषयी लोकांमधील समज अजून म्हणावे तसे स्पष्ट नाहीत. तसं पाहाता पती-पत्नीमधील वयात १ ते ३ वर्षांचं अंतर असणं हे सर्वार्थाने इष्टतम असतं.

हेही वाचा : आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…

अलीकडच्या काळात मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय. मुली आता नोकरी-व्यवसाय करून आर्थिक स्वावलंबी झाल्याशिवाय लग्न करण्यासाठी तयार होत नाहीत. तोपर्यंत त्या वयाच्या तिशीत पोहोचतात साहजिकच मनासारखं ‘स्थळ’ मिळण्यासाठी वेळ लागत आहे. वाढणारं वय हे लग्न ठरण्यामध्ये अडचण ठरत आहे. मुलीचं वय वाढलेलं आणि तिला साजेसा, पसंत असलेला वयाने मोठा असणारा नवरा मुलगा मिळणं अनेकदा कठीण असतं. अशा वेळी तडजोड करावी लागते. तडजोड करताना वयाची अट शिथिल केली तर? म्हणजे समजा कमी वयाच्या मुलाशी लग्न केलं तर वैवाहिक जीवन सुरळीत राहील ना? लोक काय म्हणतील? मूलबाळ होण्याच्या बाबतीत काही समस्या तर येणार नाहीत ना? असे प्रश्न नव्याने लोकांसमोर उभे आहेत.

वैवाहिक जीवनाला अनेक पदर आहेत. पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी असल्यास मूलबाळ होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात का, याचा आपण विचार करू. स्त्रियांसाठी मूल होण्याचं सर्वोत्तम वय म्हणजे २० ते ३० वर्षं. ती गर्भवती राहण्याची शक्यता वयाच्या ३२ वर्षांनंतर कमी होण्यास सुरुवात होते आणि वयाच्या ३७ वर्षांनंतर जास्त गतीने शक्यता कमी होते. वय वर्षं ४० पर्यंत पोहोचल्यानंतर प्रत्येक महिन्यात गर्भधारणा राहाण्याची शक्यता फक्त पाच टक्के एवढीच राहते.

हेही वाचा : The Sky Queen: कॅन्सरवर मात करून सुरू केला स्वतःचा व्यवसाय अन् झाली करोडो रुपयांची मालकीण

प्रत्येक मुलीला जन्मतः निसर्गाने तिच्या स्त्री-बीजांड कोशात (Ovary) काही ठरावीक स्त्री-बीजांचा (Eggs) साठा (स्टॉक) दिलेला असतो. मुलीचं वय जसं जसं वाढतं तसं तसं त्या स्त्री-बीजांची संख्या निसर्गतःच कमी होत जाते. फक्त संख्याच नाही तर Eggs ची गुणवत्ताही कमी होत जाते. वय वर्षं ३५ नंतर विकृत गुणसूत्र असलेले स्त्री-बीज (abnormal chromosomes) तयार होण्याची शक्यता वाढते. अशा स्त्री-बीजांचा पुरुष शुक्राणूशी (sperm) संयोग होऊन निर्माण झालेल्या गर्भधारणेत जन्मदोष असू शकतात किंवा तिचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. ढोबळ मानाने वय वर्षं ३५ नंतर स्त्री-बीज संख्येने कमी होतात आणि त्यांचा दर्जा निसर्गतःच कमी होतो. याउलट पुरुषांच्या बाबतीत अशी परिस्थिती नसते. वाढत्या वयानुसार स्त्रियांची गर्भवती होण्याची शक्यता स्त्री-बीजनिर्मिती कमी झाल्यामुळे जशी निसर्गतःच कमी होत जाते तसं पुरुषांच्या बाबतीत होत नाही. अगदीच ढोबळ भाषेत बोलायचं झाल्यास एखादा ७० वर्षांचा पुरुष निसर्गतः ‘बाप’ होण्याची क्षमता बाळगून असू शकतो, पण ७० वर्षांच्या स्त्रीला ते शक्य नाही. फक्त जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितल्यास स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेचा कालावधी हा पुरुषांच्या कालावधीपेक्षा निसर्गतःच तुलनेने बराच कमी आहे. लग्नाच्या वेळेस मुलीचं वय मुलापेक्षा कमी असल्यास प्रजननासाठी तिला कालावधी जास्त मिळतो.

या सर्व विवेचनाचा अर्थ असा की, मुलींनी वयाच्या ३५ वर्षानंतर गर्भवती होण्याचं टाळावं. याचा अर्थ वय वर्षं ३७-३८ ला गर्भधारणा होऊन बाळ-बाळंतीण सुखरूप राहणारच नाहीत असं नाही. एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंब मर्यादित ठेवण्याचं महत्त्व पटलेल्या या समाजात, स्त्री आणि पुरुषामधील प्रजननाच्या संदर्भातील या जीवशास्त्रीय स्तरावर असलेल्या फरकाचा फारसा फरक पडेल असं वाटत नाही. गरज आहे ती मुला-मुलींची आणि त्यांच्या आई-वडिलांची मानसिकता बदलण्याची. आपली होणारी बायको आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे किंवा होणारा नवरा वयाने लहान आहे, लग्नानंतर कसं होईल? काही समस्या तर येणार नाहीत ना? या मानसिकतेतून बाहेर यावं लागेल.

हेही वाचा : वडिलांचे हरपले छत्र, घर खर्चासाठी सुरू केले इंग्रजीचे क्लास; आज कमावतेय लाखो रुपये; वाचा नीतू सिंग यांचा संघर्षमय प्रवास

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करावं की करू नये? याचं उत्तर ‘हो’ असायला हरकत नाही. मूलबाळ होण्याच्या संदर्भातदेखील काही विशेष समस्या निर्माण होतील असं वाटत नाही, पण वर नमूद केलेले काही जीवशास्त्रविषयक आणि सामाजिक वास्तव लक्षात ठेवावं लागेल.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

atnurkarkishore@gmail.com