सकाळी उठलं की मिश्री चोळायची, टमरेल उचलायचं आणि लाईनीत उभं राहून सकाळचं आटोपून घ्यायचं. चूळ मारली की घरात पुन्हा कामाला लागायचं. किराणा काय आहे ते पहायचं, राधांयचं आणि बाहेर पडायचं. शांता मावशीचं हे सर्व होईतो वरती बाप्या रात्रीच्या नशेत! सकाळी आपल्या घरात राबून लोकांच्या घरात राबायला आलेल्या शांता मावशी काहीबाही बोलताना नवऱ्याचा विषय निघताच एक जोरदार शिवी देतात! ‘तुम्हाला सांगते,’ असं म्हणत ‘काल काय झालं,’ची टेप लावतात! आता हा संवाद मलाही रोजचा झालाय.

मी सासरी आले त्याआधीच शांता मावशी हे रसायन आमच्या या घरात पूर्णत: मिसळून गेलं होतं. नाव ‘शांता दबडकर’, पण वागणं बोलणं म्हणाल तर नावाच्या नेमकं उलट- ‘फुल टू गागाट’! तोंडात चुनामिश्रीत तंबाखू ठेवत कामाला सुरूवात करतात. “माझ काम नादर (चांगलं) असतं. उगाच आवाज नाय करायचा! शांताबाई काम करते जीव ताेडून, तसं पैसे पण घेते वाजवून!” हे त्यांच्या तोंडून दिवसातून एकदा तरी ऐकायला मिळणार!

खरं तर शांता मावशींचं वय फार नाही. जेमतेम ५० ते ६० च्या मध्ये. सावळा रंग, बुटक्याशा. त्यांच्याकडे पाहिलं तर यांना दोन मुलं, दोन मुली, जावई, सुना, नातवंडाचा गोतावळा आहे, हे खरं नाही वाटणार. कामात एवढ्या तरल, की भांड्याचा पसारा अवघ्या काही मिनीटांत आवरणार. त्यांच्याशी कोणी डोकं नाही लावलं तर कामात खोट नाही. पण घरातलं कोणी शहाणपणा शिकवायला गेलं, की या किटकिट करत कामात चुका करत राहणार. शांता मावशी केवळ नावाच्या! डोक्यात आणि तोडांत असंख्य शिव्यांची लाखोली! पण त्याला कारणंसुद्धा तशीच आहेत. रोजच्या त्यांच्या गप्पांमधून ती माझ्यापर्यंत पोहोचतात.

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरातल्या झाडांसाठी पाणी

मूळच्या यवतमाळच्या शांताबाई कामाच्या शोधात नाशिकला आल्या. येथील झोपडपट्टीत बस्तान बसवलं. दोन मुली आणि त्या दोन घरची धुणीभांडी करायला लागल्या. दोन्ही मुलं आणि नवरा कामावर जातो. आता वरवर काय वाटेल, की सगळं आखीवरेखीव आहे की! पण या संसाराच्या चित्रातले सगळे रंग बेरंग आहेत! दोन्ही मुलं दारूच्या पूर्ण आधीन. नवऱ्यानंच ही शिकवण दिली पोरांना! एकट्या शांताबाईच्या कमाईवर घर चालतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

शांताबाईंचा मोठा मुलगा रमेश. लग्न झालेलं. त्याची बायको पोलीस दलात शिपाई म्हणून काम करते. तिनं यवतमाळलाच आपलं बिऱ्हाड थाटलं. आपल्या आईच्या घरात हिचा संसार सुरू होता. पण नवरा रमेश बायको दारू पिऊ देत नाही म्हणून नाशिकला आला. रोज कमवतो आणि दारूत गमावतो!

दुसऱ्या मुलाचं गॅरेजमध्ये काम सुरू आहे. संध्याकाळची वेळ झाली की हा बार मध्ये, नाही तर देशी दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसतो. शांताबाईंचा नवरा तर घरातच दारूच्या नशेत.

हेही वाचा… लस्ट स्टोरीज् – २: घरमालकीण आणि कामवालीच्या आयुष्यातली शृंगारकथा लक्षवेधी!

दोन्ही मुलींची तऱ्हाच वेगळी! मोठ्या मुलीचे लग्न झालं. ती जवळच्या झोपडपट्टीत राहते. क्षमा तिचं नाव. तिचा नवरा कामधंदा करत नाही, म्हणून शांताबाईनं बचत गटाचं कर्ज काढून त्याला रिक्षा घेऊन दिली. तरी क्षमाचं एकच- “नवरा घरी खर्चाला पैसे देत नाही. मला पैका दे!” पोरंग आजारी आहे, घरातला किराणा संपला, अशी रोज वेगवेगळी कारणं समोर येत राहतात.

दुसरीचा नवरा महापालिकेत नोकरीला. तिनं माहेरच्या घरातल्यांशी संबंध तोडले. “तुम्ही पेताड लोक दारात नको,” म्हणाली! फक्त रक्षाबंधन, दिवाळी आणि मोठ्या सणाला येऊन कपड्यांसाठी पैसे घेऊन जाते!

तर ही अशी कथा शांताबाईंची! या सगळ्या धावपळीतही आपलं आर्थिक गणित त्या जुळवून आहेत. सात घरची भांडी, काही ठिकाणी धुणं, काहींकडे लादी पुसणं, याशिवाय घराबाहेरचं गवत काढून दे, गहू निवडून दे, असं करून मिळेल त्या मार्गानं पैसे जमवत रहायचं. घरी गेल्या की अनेकदा नवरा आणि मुलगा दारूसाठी लाथाडणार, शिव्या देणार, तमाशा करत पैसे खेचून घेऊन जाणार. मग पुन्हा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत कायम! कोणाकडून उचल घेत मुलींचं आजारपण, त्यांनी इतर ठिकाणी करून ठेवलेली उधार-उसनवार फेडण्यात शांताबाईंचा महिना जातो.

त्या परवा सांगत होत्या, “महिन्याच्या पगाराच्या दिवशी आता पैका लपवूनच ठेवते मी. देत नाही पहा कोणाला! आधी घरात किराणा भरते. भिशी लावते. जरा दागिना घ्यायचा आहे हो! साड्या बी पाहिल्या आहेत…” आशा-आकांक्षा कुणाला नसतात! शांताबाईंच्या डोळ्यांतसुद्धा दिसतात त्या. पण रापलेल्या हातांवर कष्टांच्या खुणा! ऐन दुपारी त्यांची आमच्याकडून पुढे दुसऱ्या कामावर निघायची गडबड होती. शांता मावशी हक्कानं विचारत होती, “बाई, भाकरतुकडा आहे का? रातचाबी चालेल. तिखट टाकून खाऊन घेईल. रातच्या मारलं भ*व्यांनी… अंग ठणकतंय!” असं सांगत त्या स्वयंपाकघराच्या उंबऱ्यावर बसल्या. पुन्हा “काय झालं ना…” म्हणत कर्मकहाणी सांगत बसल्या. या कार्यक्रमाची मलाही आता सवय झालीय. जेवणाचे दोन घास पोटात गेले, तेव्हा म्हणाल्या, “आता फक्कड चहा करा. भरपूर साखर टाकून!”

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरातल्या झाडांची काळजी

पै पै पैशांसाठी तिळतिळ तुटणाऱ्या शांता मावशींनी झोपडपट्टीत स्वत:चं घर केलं. त्या घरावर घरकुल योजनेत त्यांना घर मिळालं. ते घर भाड्यानं देऊन त्या भाड्याच्या पैशावर त्यांनी गावाकडचं जुनं, मोडकळीस आलेलं घर बांधायला घेतलं आहे! अशा दोन घरांच्या मालकीण असलेल्या शांतामावशी आता नव्या घरात रहायला जाणार आहेत… तेही एकट्या!

त्या चहाचा भुरका मारत हे मनोरथ मला सांगत होत्या आणि मी विचार करत होते, इतकी वर्षं आयतं पोसलेला व्यसनी नवरा आणि दोन मुलगे त्यांना हे करू देतील का? की मारहाण करतील तेव्हाही? लहानपणापासून काबाडकष्ट करून इतरांना पोसण्यात आणि कुटुंब चालवण्यात जन्म गेलेल्या शांताबाईंना स्वतःच्या हक्काच्या घरात आरामात, एकटीसाठी फक्कड चहा करून भुरके मारत तो प्यायचाय! तिची ही आशा कधी पूर्ण होईल?…

lokwomen.online@gmail.com