श्रद्धा दामले
एका सुरक्षित जागी, ठरलेल्या टेबल आणि खुर्चीवर बसून गाझामधल्या मुलांबद्दल आणि महिलांबद्दल लिहिण्यासाठी लॅपटॉप उघडला मी! पण मनात प्रचंड धुरळा उडालेला होता. कुठून सुरुवात करावी? गाझामध्ये काय सुरू आहे हे जगभरात वेगवेगळ्या माध्यमांमधून लोकांसमोर येतंय. त्यांचं दुःख आपल्या लिखाणातून जर नीट मांडता आलं नाही, तर ते व्यर्थ आहे ही एक भावना मनात होती.
युद्धात सामान्य नागरिकांना मारणं, छळणं, मोडणं, नेस्तनाबूत करणं सोपं असतं! घरं बेचिराख केली, अन्न-पाण्याचा पुरवठा तोडला, महिलांवर लैंगिक अत्याचार केले, यातून चुकूनमाकून जगणाऱ्या लहान मुलांच्या मनावर आयुष्यभराचे घाव दिले, की ते युद्ध तिथल्या जमिनीत कायमचं मुरलं जातं. कायमचं! जगल्या-वाचलेल्यांच्या शरीरावरचे घाव भरतील पण त्यांच्या मनावरचे आणि जमिनीवरचे घाव कसे बरे भरले जातील?
”त्यानं माझं खेळणं घेतलं…” अशी तक्रार ओक्साबोक्शी रडत आईकडे करायच्या वयातला, गाझातला एक लहानगा व्हिडीओत म्हणत होता, ”आम्ही फक्त इथे बसलो होतो, वेळ घालवत होतो आणि हल्ला झाला. माझे भाऊ मारले गेले… कुठून झाला हल्ला.. ते गेले…”’ त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचा प्रश्न आणि झालेला त्रास आतडं पिळवटून टाकणारा होता. अनेक लहान मुलं आपापल्या जखमी भाऊ-बहिणींना ओढून नेतायत. कुणाचे वडील गेलेत, तर त्यांची जागा आपसूक घेऊन ही मुलं ते काम करतायत. असंच चित्र गेले कित्येक आठवडे आपल्या डोळ्यांसमोर येतंय. आसपास प्रचंड प्रमाणात जीवितहानी होत असताना, पुढच्या क्षणी काहीही होईल याची भयंकर जाणीव त्यांना झालेली असताना त्यांच्या इवल्या हातांना हे काम करावं लागतंय.
गाझापासून वीसेक किलोमीटरवरच्या रेफ्युजी कॅम्पमधल्या, एका नऊ-दहा वर्षांच्या मुलीनं याही परिस्थितीमध्ये तिचा अल्लावर विश्वास असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं. ती म्हणतेय, ”मी घाबरले नाहीये… कारण आत्ता फक्त सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. पण माझ्या लहान बहिणी प्रचंड घाबरलेल्या आहेत. त्या रात्री झोपेतून ओरडत उठतात. त्यांच्यासाठी मला काही करता येत नाही…” या शब्दांतल्या तिच्या काळजीला वाखाणावं, की ती अकाली कायमची मोठी झाली याचं वाईट वाटावं हे कळेनासं झालंय! लहान मुलांचं हे रुप अतिशय अस्वस्थ करणारं आहे.
हेही वाचा… नातेसंबंध: मूल माझ्याच पोटात का वाढवू?
युद्ध म्हटलं की सर्रास स्त्रीवर अत्याचार करण्याच्या घटना घडतात. एखाद्याला शत्रू मानून त्याला नामोहरम करताना त्यांच्या मुलींवर, स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करायचे, लचके तोडायचे, की एका दगडात अनेक पक्षी मारले जातात म्हणे! याच संदर्भात ‘द जेरुसलेम प्रेस क्लब अँड मीडिया सेंटर’नं गेल्या आठवड्यात एक सेशन घेतलं. हमासनं केलेले अत्याचार गंभीर असूनही, जागतिक स्त्रीवादी आणि मानवाधिकार स्वयंसेवी संस्थांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान लैंगिक हिंसाचाराच्या गंभीर विषयावर मौन बाळगलं आहे आणि याचसाठी हे सत्र आयोजित करत असल्याचं या क्लबतर्फे सांगण्यात आलं.
इस्त्रायलमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या नोवा फेस्टिव्हलमध्ये गेलेल्या ज्यू स्त्रियांना हमासच्या सैनिकांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागलं. जिवंत असताना मरणयातना भोगून जीव घेण्यासाठी याचना कराव्या लागल्या. सोबत्यांना मरताना पाहणं आणि स्वतः जिवंत असताना क्रूर, लैंगिक अत्याचाराला बळी पडणं अनेक महिलांना सहन करावं लागलं. प्रत्यक्षदर्शींनी यानंतर पोलिसांना दिलेल्या रिपोर्टमध्ये अत्यंत व्यथित करणाऱ्या घटना नोंदवल्या आहेत. बलात्कार करत असताना एखादीच्या डोक्यात गोळी घालणं आणि नंतरही देहाची विटंबना करणं, एखादीला संपूर्ण गटात आळीपाळीने बलात्कारासाठी फिरवणं, बलात्कारानंतर स्त्रीचे स्तन कापून टाकणं, असे क्रूर प्रकार महिलांनी भोगले आणि पाहाणाऱ्यांनी ते पाहिले. तो दाह मनात असलेल्या अनेक पुरुषांना आणि लहान मुलांना ओलीस म्हणून गाझाला नेलं गेलं. महिला लेफ्टनंट आणि सर्व्हायव्हर तमार यांनी साक्ष दिली, त्यात म्हटलं आहे की हमासच्या माणसानं तिचे कपडे काढायचा प्रयत्न केला. “पण तेवढ्यात दुसरा माणूस आला आणि खेचत त्याला दुसरीकडे घेऊन गेला. त्यामुळे मी जगले, वाचले.”
हमासच्या एका पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी करताना त्याला विचारण्यात आलं होतं, की तुम्ही महिलांवर अत्याचार का करताय? मुलांना का पकडून नेताय? त्यानं थंडपणे उत्तर दिलं होतं, “बलात्कार करायला.” दुसऱ्या एका दहशतवाद्याने हे कबूल केलं, की त्यांना ऑर्डर्स मिळाल्या होत्या की लहान मुलांना संपवा म्हणजे त्यांच्यातून ज्यू वाढणार नाहीत. ओलीस म्हणून गाझामध्ये नेलेल्या अनेकानेक महिला आणि मुलांना शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशा अत्याचारांना सामोरं जावं लागलं आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी त्याच्याही पुढे जात त्याचे व्हिडिओ बनवून ‘बघा आम्ही कसा त्रास देतो,’ हे दाखवायचा प्रयत्न केला.
जगभरातून युद्धविरामासाठी ठिकठिकाणी आंदोलनं झाली, चर्चा होत आहे, अनेक नेते दहशतवादाविरोधात आवाज उठवत आहेत. हमासच्या ताब्यात गाझामध्ये असलेल्या लोकांना हळूहळू सोडवलं जात आहे. इस्त्रायल आणि हमास दोन्ही आपापल्या ताब्यातील सैनिक आणि ओलिसांची सुटका करत आहेत.
युद्धाचे परिणाम थेट भोगणाऱ्यांचा आक्रोश ते शत्रूच्या ताब्यातून बाहेर आलेल्यांच्या चेहऱ्यावरचं एक हसू… यात आशेचा किरण मनात कायम राखणं प्रयत्नपूर्वक साधावं लागतं.