चारुशीला कुलकर्णी

आज स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायत. घर आणि ऑफिस या दोन्हीही आघाड्या उत्तमपणे सांभाळतायत, त्यामुळे अनेकदा त्यांना ‘सुपरवुमन’ म्हणूनच संबोधलं जातं. पण हे ऐकायला, वाचायला छान वाटत असलं तरी दैनंदिन जीवनातलं वास्तव फार वेगळं आहे. कारण प्रत्यक्षात अनेक लाेकांची मानिकता ही स्त्रियांकडे तुच्छतेनं बघण्याचीच असते. त्यात स्त्रियांनी वाहन चालवणं हा विषय तर अनेकांच्या टिंगलटवाळीचाच!

एखादी महिला दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवत असली तर तिच्यावर टिकाटिप्पणी करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मग राज्य परिवहन महामंडळाच्या महिला चालक-वाहक त्यास अपवाद कशा असतील? प्रवाशांचा विश्वास मिळविणं आणि कामाच्या ठिकाणचे अंतर्गत वाद, राजकारण या परिस्थितीत महिला चालकांसमोर स्वत:ला सिध्द करण्याचं मोठं आव्हान आहे.

अलीकडेच राज्यात लालपरीच्या चालक-वाहक या एकत्रित कामासाठी काही महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं. एरवी लालपरीची चावी फिरवत बस चालकाच्या कक्षात बसणारा, तोऱ्यातच ‘ए सरक, दिसत नाही का… गिअर टाकायला अडचण होईल…’ हा माजोरा सूर आता बदललायला लागलाय तो एसटी महामंडळाच्या खाकी गणवेशात महिला वाहनचालकांनी लालपरीची धुरा सांभाळत आहेत म्हणून. मात्र हे चित्र अनेक प्रवाशांसह महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनाही अद्याप रुचलेलं नाही असं एकूण चित्र आहे. राज्यातील काही महिला वाहनचालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठांचा दबाव, अंतर्गत राजकारण, पुरूष सहकाऱ्यांनी पुकारलेला असहकार यांमुळे त्यांची घुसमट होत आहे.

काही विभागांमध्ये महिलांना वाहनचालकाची संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. याविषयी बोलताना एकीनं सांगितलं, ‘‘चार वर्षं म्हणजे २०१९ मध्ये वाहनचालकाच्या प्रशिक्षणसाठी माझी निवड झाली. दरम्यान करोना आला, त्यानंतर एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. अशी वेगवेगळीच अडथळ्यांची शर्यत सुरू असताना वर्षभरापूर्वी प्रशिक्षण पूर्ण झालं. चार वर्षं कुठल्याही प्रकारचं वेतन नव्हतं. नियुक्तीनंतर वेतन सुरू झालं. आता पगार सुरू झाला. त्यामुळे कुटुंबासाठी आर्थिक मदत करू शकतेय याचंच समाधान आहे. पण पुरुषी मानसिकतेचा फटका तिलाही बसतोय.

दुसरीची व्यथा अशी की, तिला दुर्धर आजार असल्याचं प्रशिक्षणात समजलं. मात्र त्यावरील उपचारांसोबत प्रशिक्षण सुरू ठेवलं. आगारात ती वाहक म्हणून काम करत आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या अंतर्गत राजकारणारानं काम करताना अनेक अडचणी येतात. अशावेळी कुठे तरी आपल्यातला आत्मविश्वास कमी होत असल्याचं जाणवतं. अनेक जण सोयीच्या ठिकाणी ड्युटी मिळवतात. मला गर्दीचं ठिकाण मिळतं. प्रवासी वाहतूक करायला अजून संधी मिळालेली नाही. गाड्यांची अवस्था वाईट आहे. माल वाहतूक करण्याची संधी महिन्यातून दोनदा मिळते. पण आगारातून दुसऱ्या ठिकाणी बस नेतो तेव्हा तेथील पुरूष सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागतं. या ठिकाणी कामाला महिला नकोच अशीच त्यांची भूमिका असते. त्यांच्या या टोकाच्या विरोधामुळे तिला गाडी त्याच ठिकाणी सोडून परतावं लागलं. याबाबत विभाग स्तरावर चौकशीला सामोरं जावं लागलं. तिसरी महिला म्हणाली, चालक म्हणून आत्तापर्यंत केवळ दोन वेळा काम करता आलं. गाड्यांची आणि रस्त्यांची अवस्था पाहून प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ नको. ब्रेक, क्लच अन्य काही तांत्रिक बिघाड यांमुळे आपलं वाहक (कंडक्टर) म्हणून काम केलेलं चांगलं असंच वाटतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौथ्या महिलेचे वडील वाहनचालक असल्यानं तिला लहानपणापासूनच गाड्या चालवण्याची आवड होती. ही आवडच पुढे आपलं काम असावं यासाठी चार चाकी वाहन मालवाहतूक, प्रवासी वाहतूक प्रशिक्षण घेतलं. महामंडळाची जाहिरात आल्यावर महिला चालक- कंडक्टर प्रशिक्षण पूर्ण केलं. सगळ्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रवासी वाहतूक करण्याची संधी तिला मिळाली याचा आनंद वाटतो. घरी, सासरी आणि माहेरी पाठिंबा असल्यानं कामात अडचण आली नाही. पहिल्यांदाच कामावर रुजू झाले तेव्हा प्रवाश्यांचे डोळे विस्फारलेले होते. ‘हिला नक्की गाडी चालवता येईल का?’ असे भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होते. मात्र पहिलीच फेरी विनाअडथळा पार केली. त्यावेळी अनेकांनी व्हिडीओ तयार केले. सोशल मीडियावर अपलोड केले. ते पाहून खूप भारी वाटलं. महामंडळाच्या आधी स्मार्ट सिटी कंपनीच्या, बस वाहतुकीसाठी काम केल्यानं रस्त्यांची माहिती होती. प्रवासी वाहतूक खऱ्या अर्थाने आव्हानात्मक काम असते. पण हे आव्हान पेलता येतंय याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. एस.टी. महामंडळात महिला चालक-वाहक दाखल झाल्या याचं खूप कौतुक झालं, पण समाजातील पुरुषी मानसिकता, प्रवाशांचा महिला चालकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टीकोना अशा अनेक आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे.