“कवापासून काय सुरूय तुमचं?… काय ढोसायचं, खायचं ते खा आणि मला बाहेर पडू द्या!” शांताबाई नवऱ्यावर वैतागात होत्या. त्यांना आता घराजवळच्या मैदानावर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जमा झालेली गर्दी खुणावत होती. व्यसनी नवऱ्याचं जेवण पटकन आटोपलं म्हणजे आपण लगबगीनं सभेच्या ठिकाणी जाऊन बायकांच्या घोळक्यात जागा धरायची, असा त्यांचा मनोदय. सामान्यांच्या गर्दीची बड्या मंडळींकडून सुरू असलेली खातिरदारी अनेकांप्रमाणे शांताबाईंनाही हवीहवीशी वाटत होती…

निवडणुका आणि शांताबाईंच्या वस्तीचा संबंध मतदानापूर्वीच येतो! मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुकीला उभ्या असलेल्यांकडून झालेल्या लक्ष्मीदर्शनाचा लाभ मिळून वस्तीतलं प्रत्येक घर पुढचे आठ ते दहा दिवस तरी निवांत असतं. काही जण दोन दिवसांतच पैसे उडवून मोकळे होतात! पण काही बाजूला ठेवतात. त्यातून घराच्या उपयोगी पडेल असं काय घेता येईल, याचे आराखडे स्त्रिया बांधत असतात. शांताबाईंच्या डोक्यातही असंच काही तरी चाललेलं होतं. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची खुमखुमी राजकीय लोकांमध्ये होती. वाटेल तेवढे पैसे मोजण्याची त्यांची तयारी शांताबाईंनाही माहिती होती. आपण त्याचा फायदा घ्यायचं त्यांनी ठरवलं. सकाळीच त्यांना ज्या ज्या घरी धुणीभांडी होती तिथे दांडी मारली. ‘दुपारी दवाखान्यात जायचंय,’ असं सागून टाकलं. घरातलं आटोपत असताना नवऱ्याचा ढिलेपणा त्यांना त्रासदायक वाटत होता. आज दारूची बाटली बाजूला ठेवून नवऱ्यानं आपल्याबरोबर यावं, गर्दीत मिळणारी बटाटा भाजी आणि पुऱ्यांची पाकिटं गोळा करावीत, आणखी काही नाश्ता दिला तर तो घ्यावा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायला मदत करावी, फेरीसाठीचे ५०० रुपये घ्यायला त्यानंही पुढे व्हावं… म्हणजे आठवड्याभराचा खर्च सुटेल, असं शांताबाईचं मत. पण नवरा काही साथ देईना. शेवटी त्याचं जेवण वाढून ठेवून शांताबाईंनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. आवरून तरातरा बाहेर पडल्या आणि मैदानाच्या दिशेनं चालू लागल्या. आता त्या अनेकीच्या गर्दीचा भाग होत्या…

हेही वाचा… Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली

“अहो ऐकलंत का? आज पक्षाचे ज्येष्ठ नेते येताहेत… या निवडणुकीत काही अर्ज मिळेल असं काही दिसत नाही. तुम्ही दिल्ली-मुंबईच्या कितीही वाऱ्या करा, पण तुमचं काम होतं की नाही ते समजत नाही! ३३ टक्के आरक्षणात मला संधी मिळेल का ते पहा… या वेळी नाही, तर पुढच्या निवडणुकीत तरी आपल्या घरात तिकीट आलं पाहिजे! मीपण तुमच्या सायबांपुढे, त्यांच्या कुटुंबापुढे किती पुढे पुढे केलंय तुम्हाला माहितीय. वेळ पडली तेव्हा सभांच्या गर्दीत घुसत, नको ते स्पर्श झेलत मी शांत राहिली आहे. हे सारं व्यर्थ नको ठरायला! काहीही होवो, आज आपली ज्येष्ठ नेत्यांशी भेट झालीच पाहिजे. अशा गोष्टींमधूनच आपण लक्षात राहू ना…”

एकीकडे हे बोलत बोलत अर्ज भरण्यासाठी जमा झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या-कार्यकर्त्यांच्या गर्दीचा सीमा एक भाग झाली. पक्ष किंवा पक्षनिष्ठेपेक्षा तिला निवडणुकीचा भाग होण्याची संधी हवी होती. या संधीच्या शोधात ती केवढातरी काळ होती… आणि तिची प्रतीक्षा कदाचित कायमच सुरू राहणार होती.

हेही वाचा… मुलगी किंवा पत्नी ते जागरूक नागरिक; कसा झाला महिला मतदारांचा प्रवास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अगं, आज सगळे जण अर्ज भरण्यासाठी एकत्र येतील… गळ्यात गळे घालत फोटो काढतील. पाच मिनिटांच्या कामासाठी दोन-दोन तास शहर वेठीस धरतील! कुठल्याही रस्त्यानं जा… यांची गर्दी समोर! ऐन घाईच्या वेळी ना बस मिळेल, ना रिक्षा… कशासाठी म्हणे, तर देशाच्या विकासासाठी निवडणुका लढवायच्या! यांच्या बोलण्यात आंतराष्ट्रीय प्रश्न, बेरोजगारी, विकास, निर्यात, असे मोठे मोठे विषय. मोठी मोठी वचनं! पण आपल्याला रोजच्या जगण्यात साध्या साध्या गोष्टीसाठी करावा लागणारा संघर्ष वेगळा असतो. तो यांच्यापासून कोसो दूर आहे!”

नाईलाजानं पटापट सकाळचं आटपून वेळेआधीच ऑफिसला जायला निघालेली स्मिता जिना उतरता उतरता शेजारणीशी बोलत होती. तिची लगबग होती नकोशा गर्दीचा आपण भाग होऊ नये ही!

lokwomen.online@gmail.com