आक्रमक क्रिकेटचे सूत्र आम्ही स्वीकारले आहे, हे न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमचे शब्द मार्टिन गप्तिलने शनिवारी तंतोतंत खरे ठरवले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर जोरदार ‘हल्लाबोल’ केला. गप्तिलच्या विक्रमी नाबाद द्विशतकाच्या बळावर न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभारला. मग गोलंदाजीतही आक्रमण कायम राखताना वेस्ट इंडिजला २५० धावांवर गुंडाळत न्यूझीलंडने १४३ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. उपांत्यपूर्व फेरीच्या शेवटच्या लढतीत एकतर्फी विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. आता त्यांची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच चेंडूवर गप्तिलने खणखणीत चौकार वसूल केला. त्याच क्षणी न्यूझीलंडचे इरादे स्पष्ट झाले. मात्र दोन चेंडूंनंतर गप्तिलचा सोपा झेल मार्लन सॅम्युअल्सने सोडला. यानंतरही गप्तिल-मॅक्क्युलम जोडीने आक्रमण सुरूच ठेवले. षटकार खेचण्याच्या नादात मॅक्क्युलम (१२) टेलरच्या गोलंदाजीवर बाद झाला. केन विल्यमनच्या साथीने गप्तिलने दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने विल्यमसनला ३३ धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
विल्यमसनच्या जागी आलेल्या रॉस टेलरने गप्तिलला साथ देत तिसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची महत्त्वपूर्ण भागादारी रचली. सॅम्युअल्सच्या गोलंदाजीवर एक धाव घेत गप्तिलने आपले शतक पूर्ण केले. शतकासाठी ११२ चेंडू घेणाऱ्या गप्तिलने शतकानंतर नव्या जोमाने आक्रमणाला सुरुवात केली. सहकारी बाद होत असतानाही गप्तिलने चौकार, षटकारांची लयलूट केली.
शतकानंतरच्या ४६ चेंडूंत गप्तिलने १३६ धावा काढल्या. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर चौकार लगावत गप्तिलने एकदिवसीय क्रिकेटमधील सहाव्या द्विशतकाची नोंद केली. द्विशतकानंतरही गप्तिलने धुवाधार आक्रमण केले आणि निर्धारित ५० षटकांमध्ये २४ चौकार आणि ११ षटकारांसह १६३ चेंडूंत नाबाद २३७ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. कोरे अँडरसन, ग्रँट एलियट, ल्युक राँची यांनी उपयुक्त खेळी करत गप्तिलला सुरेख साथ दिली. या बळावर न्यूझीलंडने ३९३ धावांचा डोंगर उभारला. गप्तिलच्या या अविश्वसनीय खेळीसमोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने आठपेक्षा जास्त धावगतीने धावा केल्या, मात्र त्यांनी नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. अवघ्या ३०.३ षटकांत २५० धावांवर वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला. ख्रिस गेलने ३३ चेंडूंत २ चौकार आणि ८ षटकारांसह ६१ धावांची झंझावाती खेळी केली. कर्णधार जेसन होल्डरने ५ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ४४ धावांत ४ बळी घेतले. बोल्टच्या गोलंदाजीवर डॅनियल व्हेटोरीने मार्लन सॅम्युअल्सचा घेतलेला झेल सर्वाधिक चर्चेत राहिला. द्विशतकी खेळी करणाऱ्या गप्तिललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मार्टिन गप्तीलची खेळी कौतुकास्पद अशीच होती. त्याने अक्षरश: सामना आमच्यापासून हिरावून नेला. वेस्ट इंडिजच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला आणि त्याचीच किंमत आम्हाला मोजावी लागली. वेस्ट इंडिजच्या संघाने एके काळी दोनदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. परंतु सध्याच्या संघाला त्या दर्जाचा खेळ दाखवण्यात अपयश आले.
-जेसन होल्डर, वेस्ट इंडिजचा कर्णधार

पाठीच्या दुखापतीमुळे मला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळता येणार नसली तरी क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातून मी निवृत्ती पत्करत नाही. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणार आहे.
-ख्रिस गेल, वेस्ट इंडिजचा फलंदाज

धावफलक
न्यूझीलंड : मार्टिन गप्तिल नाबाद २३७, ब्रेंडन मॅक्क्युलम झे. होल्डर गो. टेलर १२, केन विल्यमसन झे. गेल गो. रसेल ३३, रॉस टेलर धावचीत ४२, कोरे अँडरसन झे. गेल गो. रसेल १५, ग्रँट एलियट पायचीत गो. टेलर २७, ल्युक राँची झे. बेन गो. टेलर ९, डॅनियल व्हेटोरी नाबाद ८, अवांतर (लेगबाइज २, वाइड ७, नोबॉल १) १०, एकूण : ५० षटकांत ६ बाद ३९३
बादक्रम : १-२७, २-८९, ३-२३२, ४-२७८, ५-३३३, ६-३६५
गोलंदाजी : जेरॉम टेलर ७-०-७१-३, जेसन होल्डर ८-०-७६-०, सुलेमान बेन १०-१-६६-०, आंद्रे रसेल १०-०-९६-२, डॅरेन सॅमी ८-०-३८-०, मार्लन सॅम्युअल्स ७-०-४४-०.
वेस्ट इंडिज : ख्रिस गेल त्रि. गो. मिलने ६१, जॉन्सन चार्ल्स त्रिफळा गो. बोल्ट ३, लेंडल सिमन्स झे. गप्तिल गो. बोल्ट १२, मार्लन सॅम्युअल्स झे. व्हेटोरी गो. बोल्ट २७, दिनेश रामदीन पायचीत गो. बोल्ट ०, जोनाथन कार्टर त्रि. गो. व्हेटोरी ३२, डॅरेन सॅमी झे. राँची गो. अँडरसन २७, आंद्रे रसेल त्रि. गो. साऊदी २०, जेसन होल्डर झे. अँडरसन गो. व्हेटोरी ४२, जेरॉम टेलर झे. गप्तिल गो. साऊदी ११, सुलेमान बेन नाबाद ९, अवांतर (वाइड ६) ६, एकूण: ३०.३ षटकांत सर्वबाद २५०
बादक्रम: १-४, २-२७, ३-८०, ४-८०, ५-१२०, ६-१६६, ७-१७३, ८-२०१, ९-२२१, १०-२५०
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट १०-३-४४-४, टिम साऊदी ८-१-८२-२, डॅनियल व्हेटोरी ६.३-०-५८-२, अ‍ॅडम मिलने ४-०-४२-१, कोरे अँडरसन २-०-२४-१
सामनावीर : मार्टिन गप्तिल

मार्टिनची द्विशतकी खेळी एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. दिमाखदार आणि अविस्मरणीय खेळी. संघाच्या संरचनेमुळे मला सलामीला येत आक्रमणाची संधी मिळते. काही वेळेला त्यात यश मिळते, कधी अपयशाला सामोरे जावे लागते. जगातल्या मातब्बर संघांना टक्कर देण्यासाठी आम्ही आक्रमक क्रिकेटचा पवित्रा स्वीकारला आहे. चाहत्यांनाही आमचा खेळ आवडत आहे. गप्तिलच्या खेळीला बाकी सर्वानी मिळून साथ देणे आवश्यक होते. चाहत्यांचा पाठिंबा अफाट होता. व्हेटोरीने पकडलेला झेल अद्भुत असा होता. गप्तिलची खेळी आणि आजचा विजय साजरा केल्यानंतर उपांत्य फेरीच्या तयारीला लागणार आहोत.
– ब्रेंडन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार

प्रत्येक चेंडूला त्याच्या वकुबाप्रमाणे खेळण्याचा आमचा प्रयत्न होता. डावाच्या सुरुवातीलाच चांगल्या भागीदाऱ्या झाल्याने मोठी धावसंख्या उभारता आली. शतक झाल्यानंतर चौकार खेचत झटपट धावा वाढवण्याचा माझा प्रयत्न होता. या मैदानावर चेंडू प्रचंड वेगाने सीमारेषेपलीकडे जात होता. चाहत्यांचा पाठिंबा अफलातून असा होता. २३७ धावांची खेळी अविश्वसनीय आहे, विश्वास बसायला थोडा वेळ जाणार आहे. आम्हाला खेळात अजून सुधारणा करायच्या आहेत. या विजयाने हुरळून जाऊन चालणार नाही.
– मार्टिन गप्तिल, न्यूझीलंडचा फलंदाज

उपांत्य फेरी
न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका
२४ मार्च, मंगळवार
सकाळी ६.३० वा.पासून
ईडन पार्क, ऑकलंड

भारत वि. ऑस्ट्रेलिया
२६ मार्च, गुरुवार
सकाळी ९ वा. पासून
सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी

अंतिम फेरी
    वि.
२९ मार्च, रविवार
सकाळी ९ वा. पासून
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न

मार्टिन गप्तील
२३७*
चेंडू    १६३
चौकार     २४
षटकार     ११

२३७  मार्टिन गप्तिलने केलेल्या धावांची संख्या. विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. त्याने ख्रिस गेलचा यंदाच्या विश्वचषकातला झिम्बाब्वेविरुद्धचा २१५ धावांचा विक्रम मोडला. एकदिवसीय प्रकारातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या.
२  वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलेल्या द्विशतकांची संख्या. वीरेंद्र सेहवागसह आता मार्टिन गप्तिलचे नाव सामील.
एकदिवसीय प्रकारात वेस्ट इंडिजला एकदाही ३०० धावांचा पाठलाग करता आलेला नाही. कसोटी खेळणाऱ्या संघांनी किमान एकदा तीनशेचा यशस्वी पाठलाग केला आहे, मात्र वेस्ट इंडिज याबाबतीतही पिछाडीवर.

३९३ विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यातली सर्वोच्च धावसंख्या. न्यूझीलंडची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या.

३१ या सामन्यातील षटकारांची संख्या. विश्वचषकात एका सामन्यातील सर्वाधिक षटकारांची संख्या.

२५० धावा ८.२च्या सरासरीने करूनही पराभूत झालेला संघ. याआधी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या नावावर हा विक्रम होता.
९६ आंद्रे रसेलने दिलेल्या धावांची संख्या. विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात एका गोलंदाजाने दिलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आता आंद्रे रसेलच्या नावावर.

३५ गप्तिलने नोंदवलेल्या मोठय़ा फटक्यांची संख्या. त्याने २४ चौकार व ११ षटकार खेचले. एकदिवसीय प्रकारात एका डावात सर्वाधिक वेळा चेंडू सीमापार धाडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गप्तिल दुसऱ्या स्थानी. भारताचा रोहित शर्मा ४२ (३३ चौकार व ९ षटकारांसह) अव्वल स्थानी.

१५३ न्यूझीलंडने शेवटच्या दहा षटकांमध्ये केलेल्या धावा. विश्वचषकात डावातील शेवटच्या दहा षटकांत सर्वाधिक धावांचा विक्रम आता न्यूझीलंडच्या नावावर.

डॅनियल व्हेटोरीने ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मार्लन सॅम्युअल्सचा उंच उडी घेत टिपलेला झेल.

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
२. मार्टिन गप्तील (न्यूझीलंड) ४९८ धावा
३. बेंड्रन टेलर (झिम्बाब्वे) ४३३ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) १९ बळी
२. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) १८ बळी
३. मोहम्मद शमी (भारत), जेरॉम टेलर (विंडीज) १७ बळी