न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात श्रीलंकेला हरवताना जो रुबाब दाखवला, तो लिंबूटिंबू संघांमध्ये गणना होणाऱ्या स्कॉटलंडविरुद्ध त्यांना दाखवता आला नाही. विजयासाठी १४३ धावांचे तुटपुंजे आव्हान पेलताना निम्मी षटके खर्ची पडली आणि सात फलंदाज तंबूत परतले. इतका घाम गाळल्यानंतर न्यूझीलंडला विश्वचषकातील सलग दुसरा विजय रडतखडत पदरी पडला. तीन विकेट राखून मिळवलेल्या या विजयामुळे किवी संघाने ‘अ’ गटात अव्वल स्थानावर मजल मारली आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्डने दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर स्कॉटलंडचा सलामीवीर कॅल्युम मॅकलीओड आणि हमिश गार्डिनर यांना भोपळाही फोडू न देता तंबूची वाट दाखवली. दुर्दैवाने तो हॅट्ट्रिक साजरी करू शकला नाही. मग टिम साऊदीने सलामीवीर कायले कोएत्झर (१) आणि कर्णधार प्रेस्टन मॉमसेन यांना पाचव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर बाद केले. त्यामुळे स्कॉटलंडची ४ बाद १२ अशी कठीण अवस्था झाली. या परिस्थितीतून मॅट माचन (५६) आणि रिची बेरिंगटन (५०) यांनी पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण त्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अँडरसनने ही जोडी फोडली. माचन ब्रेंडन मॅक्क्युलमकडे झेल देऊन माघारी परतला. मग अँडरसनने आणखी दोन बळी मिळवले, तर डॅनियल व्हेटोरीने तळाच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्यामुळे ३६.२ षटकांत १४२ धावांत स्कॉटलंचा डाव आटोपला. यात टिम साऊदी (२/३५) आणि कोरे अँडरसन (३/१८) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सलामीच्या सामन्यात सव्वातीनशेच्या आसपास मजल मारणाऱ्या यजमान न्यूझीलंडसाठी हे आव्हान फारसे कठीण नव्हते. परंतु स्कॉटलंडच्या वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे २१ षटकांत अर्धा किवी संघ तंबूत परतला. खेळपट्टीवर चेंडू चांगले उसळी मारत होते. त्यामुळे फलंदाजांना खेळणे आव्हानात्मक ठरत होते. न्यूझीलंडकडून केन विल्यम्सनने सर्वाधिक ३८ धावा केल्या. ग्रँट एलिटने २९ धावा काढल्या. अखेर २४.५ षटकांत न्यूझीलंडने लक्ष्य पार केले.
स्कॉटलंडच्या इयान वॉर्डलॉ (३/५७) आणि जोश डेव्ही (३/४०) यांनी अप्रतिम गोलंदाजी करीत न्यूझीलंडवर अंकुश ठेवला.

संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड : ३६.२ षटकांत सर्व बाद १४२ (मॅट माचन ५६, रिची बेरिंगटन ५०; कोरे अँडरसन ३/१८, डॅनियल व्हेटोरी ३/२४, टीम साऊदी २/३५) पराभूत वि. न्यूझीलंड : २४.५ षटकांत ७ बाद १४६ (केन विल्यम्सन ३८, ग्रँट एलिट २९; जोश डेव्ही ३/४०, आयेन वॉर्डलॉ ३/५७)
सामनावीर : ट्रेंट बोल्ट.

स्कॉटलंडच्या संघाने अशा खेळपट्टीवर चांगली धावसंख्या रचल्याचे श्रेय त्यांना द्यायला हवे. सामन्याच्या अखेरचा निकाल जरी समाधानकारक असला तरी कामगिरी नक्कीच सुखावणारी नाही. आम्ही सामना आणि गुण कमावले. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी उत्तम कामगिरी केली, परंतु फलंदाजी सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे.
-ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंडचा कर्णधार)

आम्ही योग्य पद्धतीने गोलंदाजी केली व त्याचे फळ मिळाले. स्कॉटलंड संघाने दिलेली झुंज ही नक्कीच अभिमानास्पद आहे. विश्वचषकातील सर्वात अननुभवी संघ असल्याचा संकोच आम्हाला मुळीच वाटत नाही. पहिल्या सामन्यातील कामगिरी आनंददायी आहे व आता आम्ही इंग्लंडशी सामना करण्यासाठी सज्ज झालो आहोत.
-प्रेस्टन मॉमसेन (स्कॉटलंडचा कर्णधार)

स्कॉटलंडच्या डावात चार फलंदाज शून्यावर बाद झाले. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात याआधी असे फक्त दोनदा घडले आहे.

स्कॉटलंडचा संघ १९९९ आणि २००७नंतर यंदा तिसऱ्यांदा विश्वचषक स्पध्रेत खेळत आहे. आतापर्यंत दोनहून अधिक विश्वचषकातील (नऊ सामने खेळून) एकसुद्धा विजय मिळवू न शकणारा हा एकमेव संघ आहे.