आभामान्याच्या घरी बारा बल सोल्याला गेलो.. खुटे सल. सासणेबाबा मॅच संपल्यावर तिरमिरतच अन्नपूर्णा हटेलाची पायरी चढले. अकोल्याच्या मोर्णा नदीकाठचं हे अन्नपूर्णा हटेल. पडोळेदादा, मानेआबा, श्रीकांत सानप, परशुराम जामकर, भगवानभाऊ या मित्रांचा अड्डा. मॅच संपल्या-संपल्या ही दोस्त मंडळी च्यापान्याला हजर झाली. ‘‘फोकट डोक्शावर चढवून ठेवायलेना बे दक्षिण आफ्रिकेयला?’’ सासणेबाबा दक्षिण आफ्रिकेवर चांगलाच चिडला होता.
‘‘जेवनगिवन करा लागते की नायी, का मॅच पाहूनच पोट भरते त्वाचं?’’ गल्ल्यावर बसलेला म्हातारा हरिदास च्याचा गरम घोट घेत मिचमिच्या डोळ्यांनी आपल्याला टोमणा मारतोय, हे बघून पडोळेदादा भडकला, ‘‘मॅच कश्यायशी खाते कळते व्हय तुले बुढय़ा? सकाऊनपासून पाहून ऱ्हायले बापा. काय मिळते मॅच पाहून?’’
हरिदास गप्प बसणारा नव्हता. मॅचमुळे सकाळपासून कुणीच गिऱ्हाईक आलं नव्हतं. आता सासणेबाबाची गँग आली तशी म्हातारा चेतला होता. ‘‘हारून ऱ्हायली का इंडिया?’’ त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने सासणे गँग खवळली. ‘‘गांज्या घोटला का बुढय़ा? जितून ऱ्हायलो ना आपन.’’ श्रीकांत सानप हरिदासच्या अंगावर चालच करून गेला. परशुराम जामकरने त्याला मध्येच अडवले नसते तर हरिदासची चांगलीच हरीभरी झाली असती. परशुराम श्रीकांतची समजूत घालू लागला. ‘‘आता काय करावं. शिरकाता, तुले बुढय़ाचा जीव घेईसन का बापा? सोड त्याले. दिलदर बुढ्ढा त्याले काहून भीक घालून ऱ्हातो. आपली इंडिया जिकायली तं पोटात दुखत अशीन त्याच्या.’’ परशुराम श्रीकांतला ग्रुपमध्ये बळेच बसवू लागला. गण्याने सहा कटिंग चहा त्यांच्यासमोर ठेवला. चहाचे ग्लास ओठाला लागले. बुढय़ा हरिदासकडे कानाडोळा करीत सासणेबाबाची गँग मॅचविषयी बडबडू लागले. ‘‘लेका, पुचाट दक्षिण आफ्रिकाची टीम.’’ सासणेबाबा मूळ मुद्दय़ावर परतला. ‘‘नाय तर काय, माया घरी बारा मये वांगं भरताले ना मिये.’’ भगवानभाऊने दक्षिण आफ्रिकेच्या या वेळच्या टीमची एका म्हणीत वासलात लावली.
‘‘व्हय तर काय, पाळायले ना पोसायले अन् फुकट डोळे वासायले!’’ श्रीकांत सानपने त्यात आणखी एका डायलॉगची भर घातली. ‘‘खाऊ खाऊ खत केलं, कर्जात शेत गेलं.’’ दक्षिण आफ्रिका त्यांच्या वकुबाप्रमाणे खेळली नाही. याचा साऱ्यांनाच राग आला होता. खरे क्रिकेटप्रेमी रंगतदार होण्याची अपेक्षा ठेवूनच मॅच पाहतात. त्यातही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकाला एकदाही हरवू शकली नव्हती, त्यामुळे साऱ्या क्रिकेटजगताचे लक्ष या मॅचकडे लागले होते; पण सुरू झाली आणि सारा दिवस टीम इंडियानेच वर्चस्व गाजवले. असं काही होईल असे टीम इंडियाच्या पाठीराख्यांनाही वाटले नव्हते. ‘‘आरं बापा, आपली टीम मंजे आला चेव त केला देव; नाई त हरहर महादेव,’’ सासणेबाबा उद्गारले. ‘‘वक्तावर काय तितंबा होतं हे कोन सांगावं. यायेळची टीम तर कोहली पोट्टय़ावरच डिपेंड, बाकी सगळा बिनभरोसा कारभार. पन टीम काय चमाकायलीय बापा. भल्ली नवाई वाटून रायली.’’ काही का असेना आपण जिंकतोय याचे सर्वानाच अप्रूप होते.
‘‘धोनीतं लय डोकायले चालवून ऱ्हायला. आश्विनले तो असा काय आलटून पालटून बॉिलग देयाले लागला का फेसच त्वांडाले आफ्रिकेच्या.’’ मानेआबा रंगात आला. ‘‘आश्विन बगून तं डुमनी बोंबलायले लागला हे बला जीव गयला, पण त्वा आऊट करूनच आश्विन पोट्टा थंड जायला ना बापा.’’
‘‘मॅच इतकी वनसायडेड होवून ऱ्हायली का मले मधी झोप लागायली. एक डुलकी काय घेतली तं आफ्रिकेच्या लगोलग चार विकेट पडून ऱ्हायल्या. भरोश्याचे गळी, परन्यावर घात करी ऐसंच होवून ऱ्हायलं.’’ परशुराम जामकर खुशीत आला, ‘‘डेरिंग माना लागीन बॉ. आज इतनी महत्त्वाची मॅच, किरकेटचा देव सचिन बघिताच मले शंभर टका खात्री यायली का आपन जितनार.’’ मानेआबा आजून सहा कटिंगची फर्माईश केली. आपला शिखरभाऊ तं कळसूबाई शिखर होवून ऱ्हायला बाबा.
‘‘अरे, आगे आगे देखो फॉम नाही म्हणून ऱ्हायलो ना सगळे, ह्यो पोट्टय़ा वर्ल्ड कप सपेपातूर एव्हरेस्ट शिखर होवून ऱ्हाईल.’’ सासणे असे जाहीर करताच हरिदास फिदीफिदी हसू लागला. तसा उसळून म्हणाला, ‘‘हटेल चालव्याची हाये की नाय बे तुले?’’
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2015 रोजी प्रकाशित
हे शिखर तर उंचच होऊन ऱ्हायला!
आभामान्याच्या घरी बारा बल सोल्याला गेलो.. खुटे सल. सासणेबाबा मॅच संपल्यावर तिरमिरतच अन्नपूर्णा हटेलाची पायरी चढले.

First published on: 23-02-2015 at 04:25 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan inspires india