News Flash

अपना टाइम आएगा!

सध्या मुंबईत बस्तान बसावे म्हणून धडपडतो आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| देवेंद्र गावंडे

नाटक-मालिका-सिनेमांत नशीब आजमावण्यासाठी राज्याच्या विविध भागांतील तरुण धडपडताहेत.. संधी मुंबई-पुण्यातच आहेत, म्हणून तिथे हवी तशी संधी मिळेपर्यंत ‘स्ट्रगल’ करताहेत अन् रंगमंचाकडून ‘जगणं’ही शिकताहेत..

 

‘जिलेट’ ही दाढीचे ब्लेड व इतर वस्तू तयार करणारी प्रख्यात कंपनी. काही वर्षांपूर्वी या कंपनीने ‘जिलेटगार्ड’ हे नवे ब्लेड बाजारात आणायचे ठरवले. त्याची जाहिरात अनोख्या पद्धतीने करण्याची योजना आखली. त्यासाठी कंपनीला काही हौशी कलावंत हवे होते. या कलावंतांनी नुकतेच मिसरूड फुटू लागलेल्या महाविद्यालयीन युवकांमध्ये जायचे, अभिनयाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास कसा गरजेचा हे सांगायचे आणि या एकपात्रीचा शेवट करताना आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी रोज दाढी करणे किती आवश्यक हे पटवून द्यायचे, असे या प्रचार मोहिमेचे स्वरूप होते. नाटक-मालिका-सिनेमांत नशीब आजमावण्यासाठी जळगावहून मुंबईला गेलेल्या धनंजय धनगरच्या नजरेत ही संधी आली. त्याने लगेच ‘जिलेट’शी संपर्क साधला. तेव्हा कळले की, कंपनीला शंभरेक हौशी कलावंत हवेत. धनंजयने लगेच ‘स्ट्रगलर्स’च्या वर्तुळात हाळी दिली. मग सारेच धावले. त्यांपैकी ६० तरुणांना कंपनीने काम दिले. कलाक्षेत्रात काम मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या अनेकांच्या पोटापाण्याची सोय झाली आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही कामे शोधता येतात हा संदेश हौशींना मिळाला. नाटय़शास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या धनंजयने ‘अ‍ॅमेझान’च्या अनेक वस्तूंचा प्रचार चौकाचौकांत अभिनय करून केला आहे. राज्य नाटय़ स्पर्धा, एकांकिका यांत भरपूर वर्षे काम केल्यावर तो मुंबईत गेला; पण नशीब काही फळफळले नाही. अखेर जळगावला परत येत धनंजयने हॉटेल थाटले आहे. मात्र स्वत:तील कला मरू नये म्हणून जाहिरातींच्या पटकथानिर्मितीत स्वत:स गुंतवले आहे. अनिश्चितता हा या क्षेत्राचा पाया आहे. मिळेल ते काम करायची तयारी असूनसुद्धा ते मिळेलच याची खात्री नसते. अशा वेळी अनेक तरुण निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. व्यसनांच्या आहारी जातात. एखाद्या चांगल्या कलावंताचे मरण डोळ्यांसमोर अनुभवावे लागते. तरीही राज्यभरातून अशा स्ट्रगलर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

रावबा गजमल हा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या व्यासपीठावरून नावारूपाला आलेला मराठवाडय़ातील तरुण रंगकर्मी. सध्या मुंबईत बस्तान बसावे म्हणून धडपडतो आहे. नाटकाचे रीतसर शिक्षण घेतलेल्या रावबाला मुंबईत जगण्यापुरते पैसे मिळवायचे असतील तर केवळ अभिनय करून फायदा नाही, हे लक्षात आले. लेखनकला त्याच्यात उपजत होतीच. मग त्याने बॅकस्टेजची कामे शिकून घेतली, निर्मितीत साहाय्यक म्हणून काम मिळवले. आता पैशांसाठी मुंबईत त्याला मालिकांसाठी लेखन करावे लागते. बरेचदा ते कामचलाऊ असते, पण रावबाचा नाइलाज असतो. ‘‘मुंबईत बाहेरून येणाऱ्या कलावंतांसाठी जोखीम जरा जास्तच असते. त्यामुळे जिद्द व चिकाटी ठेवून नाव कमवायचे असेल, तर हौशींनी व्यसनापासून दूर राहायला हवे,’’ असे तो म्हणतो. नाटक, मालिका व सिनेमा ही तशी आविष्काराची वेगवेगळी माध्यमे, पण स्ट्रगलर्स या सर्व ठिकाणी मिळेल ती कामे करत असतात, बरेचदा शोधत असतात. यातून आर्थिक स्थैर्य मिळेलच याची काहीच शाश्वती नसते. स्थिरावण्यासाठी धडपड करावीच लागते. शासनाच्या सर्वोत्तम एकांकिका स्पर्धेने राज्यातील अनेक हौशी कलावंतांना आर्थिक आधार दिला, असे रावबाचे निरीक्षण आहे. राज्य नाटय़ स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, लोकांकिका, शिवाय विभागवार होणाऱ्या नाटय़ स्पर्धामधून दर वर्षी शेकडो तरुण रंगमंचावर पाऊल ठेवतात. या प्रत्येकाचे स्वप्न मोठा नट, अभिनेता होण्याचे असते. प्रारंभी त्यांच्या स्वप्नाळू नजरेत वास्तवाचे काटे अजिबात नसतात. नंतर जसजशी वाटचाल पुढे सरकते तसतसे चटके जाणवू लागतात.

आशीष नरखेडकर हा चंद्रपूरचा तरुण कलावंत आज मुंबईत बऱ्यापैकी स्थिरावला आहे. या वाटेवर काटेच अधिक असतात, हे त्याचे प्रत्येक नवागताला सांगणे असते. शैलेश दुपारे हा विदर्भातील तरुण एफटीआयआयमधून उत्तीर्ण आहे. नाटकाच्या वेडापायी तो या क्षेत्राकडे वळला. मुंबईत दहा वर्षे ‘स्ट्रगलर’ म्हणून वावरला. अनेक ठिकाणी साहाय्यक म्हणून काम केले. आता तो चंद्रपुरात स्थिरावला असला, तरी एक भव्य सिनेमा काढण्याचे ध्येय तो बाळगून आहे. सांगलीच्या नकुल बारगजेला सहा वर्षांपासून मुंबईत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. तरीही गावी परतण्याची त्याची तयारी नाही. हा खेळ अनिश्चिततेचा असला तरी तो सोडून करायचे काय, हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे. मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे या पट्टय़ात असणाऱ्या हौशींना संधी मिळवण्यासाठी इतरांच्या तुलनेत कमी प्रयास करावे लागतात. घरी राहूनही त्यांना धडपड करता येते. राज्यातील इतर जिल्ह्य़ांतील हौशींच्या नशिबी हे सुख नसते. त्यामुळे अनेक हौशी त्या त्या विभागात नाटकाचे कार्यक्षेत्र आयुष्यभरासाठी निवडतात. मात्र त्यांच्या वाटय़ाला यशापेक्षा अपयशच अधिक येते.

रुपेश पवार हा नागपूरचा तरुण रंगकर्मी. राज्य नाटय़ स्पर्धेत त्याचे नाव आदराने घेतले जाते. नोकरी सोडून या क्षेत्रात आलेल्या रुपेशला येथील खाचखळग्यांची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच त्याने स्वत:च्या, कुटुंबाच्या गरजा कमी करून टाकल्या. व्यसनापासून दूर राहण्याचे ठरवले. आजारपण आलेच तर सरकारी रुग्णालयात जायची तयारी ठेवली. ‘‘रंगमंच तुम्हाला जगणे शिकवतो. त्यामुळे निराश होण्याचे काही कारण नाही,’’ असा आशावाद तो बोलून दाखवतो. विदर्भ-मराठवाडय़ात नाटकाला फारसा लोकाश्रय नाही. त्यामुळे आर्थिक पातळीवर तारेवरची कसरत करावी लागते. ‘‘हौशी कलावंतासाठी केंद्राच्या अनेक अनुदानपर योजना आहेत. त्या अनेकांना ठाऊक नाहीत. त्यांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’’ असे त्याचे होतकरूंना सांगणे असते. मुंबईपासून दूर राहणाऱ्या हौशींसाठी यूटय़ूबवर वाहिनी सुरू करणे हा चांगला पर्याय आहे. या माध्यमातून सर्वदूर पोहोचता येते आणि संधीही चालून येऊ शकतात. रुपेश व त्याच्या काही सहकाऱ्यांनी आता तशी वाहिनी सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

विदर्भातील हौशींना झाडीपट्टी रंगभूमीचा मोठा आधार आहे. भरपूर लोकाश्रय लाभलेल्या या रंगभूमीवर पैसाही बऱ्यापैकी मिळतो. या भागातील अनेक गावचे पाटील मृत्यूच्या दारावर असताना तेरवीला नाटकच करा, अशी अंतिम इच्छा बोलून दाखवतात. अशा काही नाटकांत काम केल्याचा अनुभव पूजा पिंपळकर या तरुण अभिनेत्रीच्या गाठीशी आहे. ती चार महिने झाडीपट्टीत शंभरावर प्रयोग करते. त्यातून मिळालेल्या आर्थिक स्थैर्याच्या बळावर नंतरचे आठ महिने मुंबईत कामासाठी ठाण मांडते. तिला आता तिथेही थोडीफार कामे मिळू लागली आहेत. नाटकापायी वेडा झालेला धनंजय मांडवकर नागपूरचा. पत्नीला नोकरी लागताच त्याने नोकरी सोडली व मुंबईला गेला. त्याला आता सहा वर्षे झाली. अजूनही स्ट्रगलर आहे. ‘‘मुंबई-पुण्यातच काम मिळते. साध्या ‘मॉब सीन’मध्ये उभे राहायचे असले तरी दोन हजार रुपये मिळतात. एखाद्या मालिकेत एक-दोन संवाद असतील तरी पाच हजार मिळतात. यातून जेमतेम जगता येते; पण काम केल्याचे समाधान मिळते,’’ असे तो सांगतो. चित्रपटनिर्मितीचा अभ्यासक्रम करून गेली सात वर्षे मुंबईत कामासाठी प्रयत्न करणाऱ्या उत्कर्ष देवला आता कुठे संधी मिळू लागल्या आहेत. त्याची बॅच १८ जणांची होती. त्यातला तो एकटाच धडपडतो आहे. उर्वरितांनी केव्हाच या क्षेत्राचा नाद सोडला.

विदर्भात नाटकाचे प्रयोग असले, की काही चेहरे हमखास दिसतात. त्यांची संघर्ष करण्याची क्षमता संपली आहे. तरीही नाटक स्वस्थ बसू देत नाही म्हणून प्रयोगाला हजर असतात. दिनकर बोरकर (नाव बदलले आहे) यांनी त्यांच्या तीनही मुलांना सनदी सेवेत पाठवण्याचे स्वप्न आरंभापासून पाहिले, तसे शिक्षण दिले. त्यातील दोघे सक्तवसुली संचलनालयात आज उच्चपदावर स्थिरावलेत. तिसरा नाटकाच्या वेडापायी मुंबईत धडपडतो आहे. सारे त्याला समजावतात, पण तो ऐकायला तयार नाही. काहींनी मुंबईत अपयश पदरी पडल्यावर खचून न जाता पुन्हा विदर्भात येऊन नाटय़ स्पर्धा घे, पथनाटय़े कर, नाटकांचे दिग्दर्शन कर अशा कामांत गुंतवून घेतले आहे. ‘‘यातून फार पैसे पदरात पडत नाहीत, पण जगण्याला आधार मिळतो,’’ असे सुशील सहारे हा तरुण रंगकर्मी सांगतो. ‘नाळ’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले बुलढाण्याचे गणेश देशमुख यांनी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. चंद्रकांत कुलकर्णीच्या मालिकेत काम करूनही त्यांची गाडी रुळावर यायला बराच वेळ लागला. घरची परिस्थिती बेताचीच. अखेर त्यांनी रंगभूमीवर प्रयत्न सुरू ठेवतानाच दुसरीकडे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. काहीच पदरात पडले नाही तर वकिली आहेच, असे हसत सांगणाऱ्या देशमुखांनी राज्यभरातील स्ट्रगलर्ससाठी ‘कलाकार गणगोत’ या नावाने दोन-तीन व्हॉट्सअ‍ॅप गट सुरू केले आहेत. त्यावर कुणाही हौशीने अडचण सांगितली, की मदतीसाठी सारे सक्रिय होतात. कुठे काम उपलब्ध होऊ शकते, तेही तिथे सर्वाना सांगितले जाते. कलेच्या क्षेत्रात सारेच अस्थिर असते. अशा वेळी टिकायचे असेल तर मूळ ध्येयासोबतच वेगवेगळ्या वाटा चोखाळण्याची तयारी ठेवल्यास बेभरवशाच्या या क्षेत्रात तग धरता येते, असा अनुभव तरुणाई सध्या घेत आहे.

devendra.gavande@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2019 2:02 am

Web Title: article by devendra gawande apna time aayega young generation akp 94
Next Stories
1 अस्वस्थ तरुणाईची ‘महापरीक्षा’!
2 तरुण आमदार, काय करणार?
3 खूप लोक आहेत..
Just Now!
X