05 August 2020

News Flash

काम करणारे.. आणि ‘कार्यकर्ते’!

संघटनेपेक्षा किंवा पक्षापेक्षा नेता आणि त्याचा चेहरा महत्त्वाचा ठरू लागला.

सुहास सरदेशमुख suhas.sardeshmukh@expressindia.com

कोणत्याही पक्षाकडे पाहा.. ‘कार्यकर्ता’ नेमके करतो काय? त्याने भक्त किंवा अनुयायी व्हावे, विचारांपेक्षा प्रतीकांना मानावे, काम असण्यापेक्षा दिसावे, असेच वातावरण चोहीकडे कसे काय?

वरून पायाच्या बोटाकडे पाहताना शर्टच्या खालच्या दोन-तीन गुंडय़ा न दिसणारा ‘कार्य-कर्ता’ दीक्षित आहारशास्त्र आणि राजकारण याची सांगड घालून बोलत होता, ‘आता अजीर्ण होईल हो यांना, किती पोट भरावं? दुसऱ्याच्या ताटातून किती घ्यावं, याला काही मर्यादा असते.’ मेगाभरतीवरचं त्याचं हे मत भाजप नेत्यांपर्यंत पोहचेल की नाही, माहीत नाही. बोलणं पुढं चालू ठेवायचं म्हणून म्हटलं, ‘येणारे सगळे जण काम काय करतील?’ यावरचं त्याचं उत्तर- ‘आता राजकीय कार्यकर्त्यांला काम काय करावं लागतं? नेत्याच्या गाडीच्या मागे गाडी लावायची, साहेबांना वेळेवर ‘रस्सा’ कोठे मिळतो हे ठरवून द्यायचं. फार तर मिरविणारी गर्दी वाढविली की भागतं सारं.’ हे चित्र सर्व पक्षांत. मग प्रश्न उरतो : पक्षाचं काम कोण करतं?

गंगापूर मतदारसंघात काम करणारा अनिल घुगे नावाचा कार्यकर्ता आठवला. त्यानं ‘अरित’ ही संस्था काढली. त्यात एमएसडब्लू झालेल्या ६०-७० तरुण मुला-मुलींना मानधनावर नेमलं. गावातील समस्या, मतदारांची माहिती, त्यांच्या अडचणी या मुलांनी एकत्र केल्या. एक अ‍ॅप विकसित केलं गेलं. त्यासाठी आमदारांनी टॅब दिला. त्यात घरातील सदस्यसंख्या आणि त्यांची इत्थंभूत माहिती गोळा करण्यात आली. या सर्वेक्षणाच्या कामातील एकीला विचारलं, ‘तुम्हाला राजकीय कामासाठी वापरलं जातंय, चालतं का तुम्हाला?’ उत्तर आलं, ‘काय हरकत आहे?’

कार्यकर्त्यांचं आऊटसोर्सिग हे आता राजकीय वास्तव झालं आहे. पूर्वी पद न मिळणारा उद्वेगानं म्हणायचा, ‘आम्ही काय नुसत्या सतरंज्याच उचलायच्या का?’ आता सतरंजी टाकण्यासाठी किंवा खुर्च्या मांडण्यासाठी मंडप टाकणाऱ्या ठेकेदाराचा माणूस काम करतो. अगदी ध्वनिक्षेपकावर ‘वन-टू-थ्री-फोर’ म्हणत ठेकेदाराची माणसं सारं काही तयार ठेवतात. बॅनर, पोस्टर लावण्यासाठी कोणी कार्यकर्ता आता बाहेर पडत नाही. अशा काळात कार्यकर्त्यांनी काय काम करायचं?- ‘व्हॉटस्अ‍ॅप’ विद्यापीठात भक्त म्हणून सामील व्हायचे किंवा त्या भक्तांना विरोध करणारा मजकूर प्रत्येक समूहात पोहोचेल, याची काळजी घ्यायची. तो मजकूर प्रसवणारा वेगळाच असतो!

पुण्यामध्ये सुहास तावरे नावाचा साधारण ३० वर्षांचा व्यंगचित्रकार आहे. २०१९ च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर टीका होईल असा आकार त्यानं रेषांना दिला. त्याला त्यासाठी पैसे मिळाले. तो सांगत होता, ‘माझी कला पोहोचते आहे आणि त्याचं मानधनही मला मिळत आहे. मग काय हरकत आहे?’

भाजपच्या ‘वॉर रूम’मध्येही असेच अनेक जण भेटतात. कधी ते फेसबुकवर नरेंद्र-देवेंद्र अशी छायाचित्रं पुढे सरकवत असतात, तर काही कोणाच्या विरोधात काय लिहून द्यायचं, यावर काम करतात. ‘भक्त’ श्रेणीतील कार्यकर्ते मग वॉर रूमचा मजकूर पुढं पाठविण्याचं काम इमाने-इतबारे करतात.

गेल्या काही वर्षांत राज्यात गणपती उत्सव आणि निवडणुका यांचा ‘सीझन’ एक असतो. हा काळ मिरवून घेण्याचा. नेत्यांना आरतीला जावं लागतं. वर्गणी द्यावी लागते. अशा काळात कार्यकर्त्यांनी कसं ‘प्रेझेंटेबल’ राहिलं पाहिजे, ही शिकवण कोणत्याही पक्षाचा नेता देत नाही. पण भाषणातून जर सतत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे उल्लेख होत असतील तर? तसे आदर्श असून चालणार नाहीत, तर ते दिसायला हवेत. मग त्या मध्ययुगीन काळातील दाढीची फॅशन करायला काय हरकत आहे? केशकर्तनालयाच्या क्षेत्रात काम करणारा जितू मालू सांगत होता, ‘निवडणुका आल्या किंवा जयंती असेल, तर कार्यकर्ते मंडळी खास दाढीही कोरून घेतात. आता संभाजी महाराजांसारखी ती असावी, यासाठी अनेक जण आग्रही असतात.’ गणपती उत्सवात अलीकडे गळ्यातील कंठमणीचीही फॅशन वाढू लागली आहे.

कार्यकर्तेपण हे आता कामावर मोजलेच जात नाही. भाळी अष्टगंध नसेल तर जणू कपाळमोक्ष होईल, असं वाटणारे अनेक जण भाजप-सेनेच्या कार्यक्रमात दिसतात. तिकडे आघाडीच्या मोर्चात किंवा सर्वसाधारण सभेत पांढरा, ऑफव्हाइट किंवा मळलेला पांढरा रंग सर्वत्र दिसतो. डोक्यावर टोपी घालणारे अधिक. पण हे गर्दीचं झालं. काळ असण्यापेक्षा दिसण्याचा आहे. त्यामुळे आता कानात इअरफोन घालून दोन मोबाइलवर झपाझप बोटे फिरविणारा ठळकपणे दिसतो. तो क्षणात नेत्याचा फोटो ‘व्हायरल’ करतो. त्याचं भारावलेपण इथं नजरेत भरतं. खरं तर पूर्णवेळ कार्यकर्ते, प्रचारक, विस्तारक अशी रचना उजव्या आणि डाव्या पक्षांत होती. आता ती मागं पडली आहे किंवा त्यातील चतुर मंडळी ‘पीए’ झाली आहेत. जी तरुण मंडळी समाजासाठी काम करतात, त्यांना राजकीय कार्यकर्ते जवळही फिरकू देत नाहीत. समाजकार्याला मदत करण्याची संधी असूनही राजकीय कार्यकर्त्यांना त्यात दिसण्यासारखे काही सापडत नाही. उदाहरणार्थ, बीड जिल्हय़ातील गेवराई येथे ‘सहारा’ हे बालकाश्रम चालविणारा संतोष गर्जे सांगत होता, ‘राजकारणातील कोणी कार्यकर्ता आमच्या पाठीशी उभा राहत नाही. दर महिन्याला किराणा गोळा करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी अनेकदा उंबरठे झिजवूनही मदत काही मिळत नाही.’

एक काळ असा होता, की राजकीय पक्षात काम करायचं तर त्या पक्षाची कार्यकर्त्यांकडे परिपूर्ण माहिती असायची. आता काँग्रेसच्या नेत्याला विचारा, अ‍ॅलन हय़ूम कोण होते? नव्यानं राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या कोणत्याही नेत्यानं दीनदयाळ उपाध्याय किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल चार शब्द सांगावेत, असं होईल का?

पूर्वी पक्षाचं काम करणं विचारांची लढाई असे. आता पक्षात काम करण्यासाठी प्रतीकं लागतात. गळ्यात आणि हातात एवढे धागे बांधावेत, की मनगट भरून जावं. गळ्यात रुद्राक्षासह आणखी काही गंडे-दोरे घातलेच गेले तर ते दिसले पाहिजेत, एवढय़ा गुंडय़ा उघडे ठेवणारे कार्यकर्तेही दिसतात. पण अशा वातावरणात काही जण अजूनही आपलं कार्यकर्तेपण जपून ठेवतात. सोलापूरमध्ये नरसय्या आडम मास्तरांसाठी काम करणारे तरुण कार्यकर्ते बाळकृष्ण अर्जुन मल्याळ सांगत होते, ‘कार्यकर्ता कसा असावा, याचं आम्हाला प्रशिक्षण मिळतं. आम्ही महापालिकेतील नागरिकांच्या समस्या सोडवतो. किमान वेतनाचा विडी कामगारांचा लढा देतो. प्रत्येक घरापर्यंत संपर्क ठेवताना त्यांना पक्षाची धोरणं समजावून सांगतो.’ पूर्वी शिबिरांमध्ये संघटनेच्या धोरणाला पूरक ठरतील अशी गाणी लिहिली जात, छोटय़ा पुस्तिकांमधून विविध राष्ट्रीय समस्यांवर माहिती दिली जाई. आता असं काम काही अंशी वंचित बहुजन आघाडीमध्येही केलं जात आहे. कधीकाळी ‘शाळेच्या दाखल्यावरून जात काढून टाका’ अशी भूमिका घेणाऱ्या अ‍ॅड. आंबेडकर यांच्या पक्षात हल्ली जातनिहाय शिबिरे होतात. वंचित आघाडीविरोधात जाणाऱ्यांवर समाजमाध्यमातून तुटून पडणाऱ्या कार्यकर्त्यांना हा अंतर्विरोध कोणी लक्षात आणून देत नाही.

स्वातंत्र्य चळवळीतील भारावलेपण संपलं, तसं गांधीयुगातील कार्यकर्ता लुप्त झाला. कामगारांच्या चळवळी संपल्या. त्यामुळे डाव्या चळवळीत तुटपुंज्या मानधनावर काम करणारा कार्यकर्ता ‘एनजीओ’त दाखल झाला. तिथं तो काही काळ स्थिरावला. सरकारपेक्षा (फक्त) आपणच शहाणे, असं या संस्थांना वाटू लागलं होतं. पण त्यापैकी काही कार्यकर्ते आजही सामान्य माणसांचा आवाज बनून काम करताहेत.

दुसरीकडे, परिवारातील कार्यकर्ता सेवाकार्यात मन रमवत होता. आजही ही संख्या लक्षणीय आहे. पण सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणारी मंडळी राजकीय व्यासपीठावर येत नाहीत. बाहेर राहून त्यांनी टोकदार भक्त संप्रदाय उभा केला आहे. त्यामुळे काम करणारे वेगळे आणि कार्यकर्ता वेगळा, असं चित्र सर्व राजकीय पक्षांत दिसत आहे.

पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना, १९९३ मध्ये खासदारांना विकासासाठी निधी देण्याचा निर्णय झाला. दोन कोटी रुपये वर्षांला मिळणाऱ्या या निधीचं लेखापरीक्षण पुरेसं नीट होत नाही, असं वर्षभरानं कळालं आणि कंत्राटदार, व्यावसायिक मंडळी कार्यकर्ते म्हणून मिरवू लागली. पुढे अनेक बदल झाले. संघटनेपेक्षा किंवा पक्षापेक्षा नेता आणि त्याचा चेहरा महत्त्वाचा ठरू लागला. कार्यकर्त्यांनी त्या चेहऱ्यासह कार्यकर्तेपणाचाही बाजार मांडला. या बाजारातला प्रत्येक कार्यकर्ता तुमचं चुकलं असो वा नसो, तो तुम्हाला ‘ट्रोल’ करेल. तुम्हाला गांधी, नेहरू अधिक माहीत असतील तर त्याची झळ अधिक बसेल. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यातलं औदार्य अधिक सांगितलं तरी अडचण येऊ शकेल. इथला एकच मंत्र आहे : काम करणारे ‘असतील’, पण कार्यकर्ता ‘दिसायला’ हवा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2019 2:30 am

Web Title: article on active political parties workers zws 70
Next Stories
1 सेवा आणि स्थिरता
2 नादाचं आत्मपरीक्षण..
3 परीघ आणि केंद्रस्थान
Just Now!
X