दसरा खरेदी
प्रत्यक्ष बाजारात महागाई जाणवत असली तरी सणासुदीच्या निमित्ताने चालून आलेल्या घसघशीत सूट-सवलतींच्या भडिमाराचा मोह गुरुवारच्या विजयादशमीच्या मुहूर्ताला ग्राहकांना टाळता आला नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर गेल्या काही दिवसांपासून पडलेले मळभ यानिमित्ताने दूर होत असल्याचे चित्र गुरुवारच्या विजयादशमीनिमित्ताने दिसले.
उत्साहवर्धक दसऱ्यामुळे आता दिवाळीतील खरेदीबाबतही ग्राहकांकडून अधिक आशा करण्यात काहीच हरकत नाही, असे मत विक्रेते-वितरकांनी व्यक्त केले. यंदा कमी झालेला मान्सून हे कटू सत्य असले तरी चालू आर्थिक वर्षांचे उर्वरित अर्ध वित्त वर्ष कंपन्या, उद्योगांसाठी आश्वासक कृतीचे बळ निर्माण करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या दसऱ्याच्या तुलनेत यंदा नाममात्र वाढ झालेल्या मौल्यवान धातूसाठी खरेदीदारांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला. गुंतवणूक म्हणून काही ग्रॅम सोने खरेदी करण्याबरोबरच पारंपरिक दागिने खरेदीकडे त्यांचा ओढा दिसला. २०११ मध्ये सर्वोच्च टप्प्याला पोहोचलेल्या सोने दरांमध्ये तूर्त ४० टक्क्यांपर्यंतची घसरण आहे. मुंबईच्या किरकोळ बाजारात तोळ्यासाठी सोन्याचा दर २८ हजार रुपयांखालीच होता.
गेल्या दोन वर्षांपासून मंदीच्या छायेत असलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासकांकडूनही दसऱ्याच्या निमित्ताने २०११ च्या किमतीत निवारा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जात होता. त्याला माफक प्रतिसाद मिळाला. मात्र शहराबाहेरील निवाऱ्याकरिता, गुंतवणूक म्हणून अधिक विचारणा होत असल्याचे विकसकांनी सांगितले.
वाहन खरेदीदारांनी त्यांच्या दिमतीला यंदा आलेल्या नव्या वाहनांची, नव्या वाहन प्रकाराची चाचपणी केली. पारंपरिक नाममुद्रेसह नव्या पिढीतील कंपन्यांच्या वाहनांसाठीही यंदा मागणी नोंदविल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेली मोटरसायकली मागणी पुन्हा एकदा उंचावल्याचे जाणवत असल्याचेही वितरकांनी मान्य केले.

ई-पेठेचा बोलबाला..
ई-कॉमर्ससारख्या माहिती तंत्रज्ञानाची जोड असलेल्या नव्या व्यासपीठावरही विशेषत: तरुण खरेदीदारांच्या उडय़ा पडल्या. यात विद्युत उपकरणे, गॅझेट तसेच तयार वस्त्रप्रावरणे यांना मोठी मागणी आहे. या मंचावर घसघशीत अशी ८० टक्क्यांपर्यंत सवलत देत असून मुंबईसारख्या शहरात आरोग्याशी निगडित उत्पादन, सेवांनाही अधिक मागणी असल्याचे दिसून येत असल्याचे इबे इंडियाच्या विक्री सेवा विभागाचे संचालक पंकज उके यांनी सांगितले.