सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकात भर घालताना सेन्सेक्स मंगळवारी थेट २५९०० नजीक पोहोचला. गेल्या जवळपास दोन महिन्यांतील एकाच व्यवहारातील सर्वात मोठी झेप मुंबई निर्देशांकाने नोंदविली. याचबरोबर दिवसातील शतकी वधारणेने निफ्टीनेही ७७०० चा टप्पा पार केला.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३६१.५३ अंश वधारणेसह २५८८०.७७ पर्यंत पोहोचला; तर १०१.१० अंश वाढीमुळे निफ्टी ७७२७.०५ वर स्थिरावला. सेन्सेक्स व निफ्टीची एकाच सत्रातील झेप ही जूननंतरची सर्वात मोठी राहिली. मुंबई निर्देशांक यापूर्वी ६ जून रोजी ३६१.५३ अंशांनी उंचावला होता.
सेन्सेक्सने नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सोमवारी १९०.१० अंशांची वाढ नोंदविली होती. मंगळवारच्या सत्राची सुरुवातही मुंबई निर्देशांकाची तेजीने झाली. व्यवहारात ती विस्तारत जाऊन थेट २५९०४.९८ या दिवसाच्या उच्चांकावर गेली; तर निर्देशांकाचा सत्रातील नीचांक २५६४५.७९ वरील राहिला.
कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या जोरावर निफ्टीनेही मंगळवारी ७७०० हा टप्पा पार केला. निफ्टी यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी या टप्प्यावर होता. निफ्टीत सोमवारीदेखील ५७.४० अंशांची भर पडली होती. दोन्ही बाजार आता गेल्या दहा दिवसांच्या उच्चांकावर आहेत. तर निर्देशांकातील झेप जूननंतरची सर्वात मोठी आहे.
जूनमधील औद्योगिक उत्पादन दर मंगळवारी सायंकाळी उशिरा जाहीर होण्याच्या आशेवरही भांडवली बाजाराने प्रतिक्रिया नोंदविली. मुंबई शेअर बाजारात मंगळवारी बँक, ऊर्जा, तेल व वायू क्षेत्रातील समभागांचे मूल्य वधारले. टाटा मोटर्सच्या फायद्यातील निकालांमुळे कंपनी समभागाने आघाडी घेतली.
जागतिक पातळीवर स्थिरावलेल्या प्रमुख निर्देशांकांनीही येथील वधारणेत भर घातली. तर कच्च्या तेलाच्या सावरलेल्या दरांनीही निर्देशांक तेजीला साथ दिली. आशियाई बाजार ०.२० टक्क्यांपर्यंतची वाढ राखून होते. युरोपीय बाजारही सुरुवातीची तेजी नोंदवीत होते.
सेन्सेक्समधील २६ समभागांचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत वधारले. यामध्ये गेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी, ओएनजीसी, सन फार्मा, एनटीपीसी, कोल इंडिया, सिप्ला, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक सहभागी होते.