सारखे पैसे मागतो. घरी काय पैशाच झाड आहे का? असं आपण अनेकदा ऐकले असेल. पण ही कल्पना खरंच सत्यात उतरेल, असा विचार कदाचित कोणी करणार नाही. मात्र, या कल्पनेतील झाडाचा अनुभव औरंगाबादमध्ये दिसून आला. चक्क एका बाभळीच्या झाडावर चलनातून बाद झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. जुन्या नोटा झाडाला अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात जुन्या नोटांच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आल्याचे पाहायला मिळाले.
औरंगाबाद सिडको एन-२ भागातील एका बाभळीच्या झाडावर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा अडकलेल्या आढळल्या. डॉक्टर सतीश गोरे रस्त्याने जात असताना त्यांना झाडावरील नोटांचे बंडल निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात यासंदर्भात माहिती दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित नोटा ताब्यात घेतल्या आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १० लाख ५० हजार रुपयांची रक्कम या बाबळीच्या झाडावर लटकवलेली होती. हा काळा पैसा नेमका कोणाचा आहे. याचा तपास सुरु आहे. झाडाखाली फळ, फुल वेचले जातात. मात्र पोलीस बाभळीच्या झाडाखाली पैसे वेचत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेबरच्या रात्री अचानकपणे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी मोदींनी घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी अशा प्रकारे नोटा सापड़ल्याची किंवा नदी-नाल्यामध्ये नोटा फेकून दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता तब्बल सात महिन्यानंतर औरंगाबादमध्ये जुन्या नोटा सापडल्या आहेत.