राज्याच्या अन्य भागांमध्ये भाजपचे कमळ फुलले असले तरी मराठवाडय़ात मात्र प्रदेशाध्यक्षांशह दिग्गज नेते असूनही भाजपला मतदारांनी अव्हेरले. आप्तस्वकीयांना उमेदवारी, ‘काँग्रेसी’ तडजोडी हे सारेच भाजपच्या मुळाशी आले. पक्षाला हा  धक्का असून, नेतेमंडळींना दुरुस्ती करावी लागणार आहे.

परळीमध्ये दिलेला काँग्रेसचा उमेदवार कमकुवत असेल तर लातुरात गोपीनाथ मुंडे दुबळा खेळाडू रिंगणात ठेवायचे. अशीच प्रक्रिया मराठवाडय़ातल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वीकारली. परभणीचे प्रभारी असणाऱ्या लोणीकरांना मतदारांनी हिसका दाखवला. या जिल्ह्य़ात भाजपचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले आहेत. नेत्यांनीच केलेल्या तडजोडीमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल तडजोडीचेच राहिले. परिणामी भाजपला पाच नगराध्यक्षांवर समाधान मानावे लागले.

नगरपालिकांच्या निवडणुकांकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. एकाही जिल्ह्य़ात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सभा घेतल्या नाहीत.  कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तानाजी सावंतसारखा एखादा लक्ष्मीपुत्र वगळला, तर शिवसेनेने नगरपालिकेत फारसे काही न करता त्यांना मिळालेले यश लक्षणीय मानावे लागेल. मराठवाडय़ात त्यांच्या पाच नगरपालिका निवडून आल्या आहेत. तुलनेने मराठवाडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेथे सभा घेतल्या, तेथील उमेदवार पराभूत झाले. उस्मानाबाद, परळी येथे किमान लढत तरी दिली. जालन्यासारख्या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच लढतीतच उतरायचे नाही, असा निर्णय खुद्द प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याने जालना नगरपालिकेत काँग्रेसचा उमेदवार ५४ हजार २०५ मतांनी निवडून आले.

मराठवाडय़ातील भाजपचे संघटन बांधणाऱ्या व्यक्तीने अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना नाहकच मोठे केले. वर्षांनुवर्षे कार्यकर्ता म्हणून सतरंज्या उचलणारा माणूस तसाच राहावा, त्यातून अशी प्रणाली विकसित झाली. अगदी औरंगाबादचा शहर जिल्हाध्यक्ष ठरवतानासुद्धा शिवसेनेतून आलेल्या नेत्याला प्राधान्य दिले गेले. क्षमता असणारी अनेक माणसे वळचणीला टाकणारी प्रक्रिया पद्धतशीरपणे हाती घेतली गेली, त्याला जातीचेही निकष लावले गेले.

संघटनच जातीच्या अंगाने उभे करण्याची पद्धत अनुसरल्यानंतर मराठा मोर्चाचा परिणाम, बहुजनपर्व अशा शब्दांचे मुलामे देत आता पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. दिलेल्या उमेदवारी- त्यातील ‘आप्त’ आणि ‘स्वकीय’ असे वर्गीकरणही आवर्जून केले जात आहे. आप्तांमध्ये अर्थातच लोणीकरांच्या पत्नीचा, मधुसूदन केंद्रेकरांच्या मुलाचा आवर्जून उल्लेख केला जात आहे. केवळ आपल्याच गटातल्या माणसाला उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी केलेले प्रयत्न लक्षात आणून दिले जात आहे. लोणीकरांनी परभणीचे प्रभारी पदही अधोरेखित केले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर या मंत्र्यांच्या नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती राज्यात भाजपला यश मिळवून दिले, पण प्रदेशाध्यक्षांना आपले गाव सांभाळता आले नाही, अशी प्रतिक्रिया भाजपमध्ये व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे यश

राज्यात अन्य भागांमध्ये पीछेहाट होत असताना मराठवाडय़ात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील आठपैकी पाच पालिकांची नगराध्यक्षपदे राष्ट्रवादीला मिळाली आहेत. मराठवाडय़ातील २८ पैकी नऊ नगराध्यक्षपदे या पक्षाने जिंकली. मराठवाडय़ातील एकूण ८७९ जागांपैकी सर्वाधिक २५१ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. मराठा मोर्चाचा राष्ट्रवादीला राज्याच्या अन्य भागांमध्ये फटका बसला असला तरी मराठवाडय़ात हा मुद्दा राष्ट्रवादीला फायदेशीर ठरल्याची चर्चा आहे. मराठवाडय़ात काँग्रेसला आठ पालिकांची नगराध्यक्षपदे मिळाली. काँग्रेसलाही बऱ्यापैकी यश मिळाले.

untitled-13