बँकेस टाळे ठोकून सेनेकडून निषेध; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रब्बी २०१५ आणि खरीप २०१६ या हंगामात झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी आलेल्या साडेपाचशे कोटींची रोकड अन्य बँकेत ठेवून त्यावर दररोज दहा लाख रुपयांचे व्याज कमाविण्याची शक्कल लढवली आहे. परिणामी आíथक विवंचनेतील शेतकरी दररोज बँकेत हक्काच्या पशासाठी हेलपाटे मारीत आहेत. पीकविम्याची रक्कम बँकेस वर्ग होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना पसे दिले जात नसल्याने संतप्त शेतकरी व शिवसनिकांनी मंगळवारी जिल्हा बँकेच्या शाखेस टाळे ठोकून बँकेचा निषेध नोंदविला.

खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ८ लाख ८६ हजार ९७२ शेतकऱ्यांपकी ५ लाख १४ हजार ६७५ शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी ४३९ कोटी ३३ लाख ३७ हजार २२३ रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. या हंगामात सोयाबीनसह उडीद, मुगाचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत तीन लाख ५४ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ५८ लाख १३ हजार २९२ रुपयांचा हप्ता भरून एक हजार २९ कोटी ६ लाख २६ हजार ५६५ रुपये रक्कम संरक्षित केली होती. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी ११२ कोटी ३५ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. ही रक्कम जिल्हा बँकेकडे वर्ग होऊन २० दिवस उलटले आहेत. मात्र बँकेनी ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याऐवजी अन्य बँकेत ठेव ठेवून व्याज कमविण्याचे नवे धोरण अवलंबिले आहे.

बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप घोणसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ मेपर्यंत पीकविम्याची रक्कम जमा करून ती वाटप करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रशासनाचे नियंत्रण सुटले

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमानीपुढे सहकारी संस्था विभागाचे जिल्हा उपनिबंधक व जिल्हा प्रशासनही हतबल आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रशासनाचे बँकेवर नियंत्रण नसल्याने हक्काच्या पशासाठी शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या पशांवर बँक दररोज १० लाखांचे व्याज मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.