तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये बहुतांश फटाके तयार होतात. महाराष्ट्रात फटाके बनविणारे १८ ते २० कारखाने कळंब तालुक्यातील तेरखेडा या गावी आहेत. या व्यवसायाला चालना देता यावी म्हणून विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात एक विशेष योजनाही मंजूर झाली होती, पण लालफितीत ती रखडली. अजूनही  ‘तेरखेडी तोटा’ हा फटाका प्रसिद्धही आहे. ११ वर्षांपूर्वी फटाका उद्योगासाठी स्वतंत्र एमआयडीसीची घोषणा करण्यात आली होती. भूसंपादनाअभावी ही घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही.

मराठवाडय़ातील भू-भाग स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या आधिपत्याखाली होता. निजामाच्या दरबारी दारूकाम करणारे अनेक छोटे-मोठे कारागीर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील होते. संस्थाने विलीन झाली आणि संस्थानिकांच्या दरबारात दारूकाम करणाऱ्यांना नवीन व्यवसाय शोधण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यातून लग्नसमारंभात दारूकाम करणे, विहिरींमध्ये दारूकाम, असा पोटापाण्याचा नवीन व्यवसाय या कारागिरांनी सुरू केला. जिल्ह्य़ातील तेरखेडा गोजवाडा आणि बावी या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मूळ दारूकाम करणाऱ्या कारागिरांच्या वंशजांनी नवीन शक्कल लढवली. कागदी पुंगळ्या तयार करून त्यात दारू भरली आणि दिवाळीसाठी एक नवीन फटाका या भागातून निर्माण झाला. ‘तेरखेडी तोटा’ म्हणून नंतरच्या काळात राज्यभरात त्याची ओळख झाली.

महाराष्ट्रात जळगाव, नागपूर, अकोला, मंगळवेढा, सांगोला, जामखेड, संगमनेर आदी ठिकाणीदेखील मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची निर्मिती केली जाते. मात्र फटाक्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची सर्वाधिक संख्या तेरखेडा येथे आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा, गोजवाडा आणि बावी या परिसरात १८ ते २० वेगवेगळे कारखाने आहेत.

फटाका औद्योगिक वसाहतीचा निर्णय लालफितीत

११ वर्षांपूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तेरखेडा येथे फटाका उद्योगासाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण आणि राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. आमदार पाटील यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यासाठी १३६ एकर गायरान जमिनीवर ही वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. फटाका उद्योगासाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा हा भारतातील पहिला निर्णय होता. मंत्रिमंडळ बठकीत यावर खल झाला आणि गायरान जमीन फटाका औद्योगिक वसाहतीसाठी देता येणार नाही, असा शेरा मारून उद्योगवाढीच्या प्रयत्नाला खीळ घालण्यात आली. आता या गायरान जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अद्यापही तेरखेडा येथील फटाका औद्योगिक वसाहतीचा प्रश्न केवळ भूसंपादनामुळे रखडलेलाच आहे.

पूर्वी शेतात मोलमजुरी करीत होतो. कष्टाच्या कामापेक्षा फटाक्याच्या कारखान्यात समाधानकारक मोबदला मिळतो, पण तो एवढा नाही की दिवाळीसाठी मुलांना आम्ही फटाके विकत घेऊ शकू. महिन्याकाठी आठ-नऊ हजार रुपये हाती पडतात. त्यातून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबातील गरजा भागवता येतात, पण फटाक्यांच्या कारखान्यात काम करण्याचा फायदा एवढाच की, मालकच नंतर बोनस म्हणून फटाके देतो. त्याला मुले खूश होतात. पण अधिक कारखाने निघाले तर मजुरीत वाढ होऊ शकेल. बबन ग्यानबा कसबे