मांजराच्या सहा दरवाजांतून पाणी सोडले; वाघदरवाडीचा तलाव फुटला

चार दिवसांनंतर पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून घाटनांदूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने सहा दरवाजांतून पुन्हा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता. मागील २४ तासांमध्ये १४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक ४१.४ मि.मी. पाऊस झाला आहे.

घाटनांदूर येथे अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आला आहे. वाघदरवाडी येथील पाझर तलाव सकाळी ११ वाजता फुटल्याने उजनी ते धसवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्या भागातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर शेतातील पिके वाहून गेली आहेत.

माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. केज आणि परिसरात झालेल्या पावसामुळे धनेगाव येथील मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून धरणाचे चार दरवाजे दीड मीटरने तर दोन दरवाजे सव्वा मीटरने उघडण्यात आले असून ७२९ क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे धरणाचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले. अंबाजोगाईसह परळी, केज, बीड, पाटोदा, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. वार्षकि सरासरीच्या तुलनेत १११.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.