दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडय़ात या वर्षी पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. दक्षिण व पश्चिम भागात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे विरळ झाल्यामुळे पावसात खंड पडला होता. विभागात सरासरी ६० टक्के इतका पाऊस झाला असला तरी बीड, उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांनी अजून ५० टक्क्य़ांची सरासरी ओलांडलेली नाही. १६ तालुक्यांची वार्षिक सरासरी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. दरम्यान, हवामान विभागाने येत्या २४ तासांत मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.

मराठवाडय़ात गेली ४ वर्षे दुष्काळ होता. पण या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. या वर्षी ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद, मका, तूर, मूग, बाजरी ही पिके शेतकऱ्यांनी घेतली. अनेक ठिकाणी मूग आणि उडीदचे पीक काढण्यात आले असून कापूस, सोयाबीन, मका, तूर, बाजरी ही पिके बहरली आहेत. पण ऑगस्ट महिन्यात कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतकऱ्याला आता मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाचे तीन महिने उलटल्यानंतरही धरणे, मध्यम प्रकल्प आणि तलावात पाणीसाठा झालेला नाही. मांजरा, माजलगाव, तेरणा, सिनाकोळेगाव ही धरणे अद्यापही कोरडी आहेत. येलदरीमध्ये ९ टक्के तर सिद्धेश्वरमध्ये १९ टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात मात्र ६५ टक्के इतका पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४३ प्रकल्पांची पातळी जोत्याच्या खाली आहे. ७२३ तलावांपैकी ३७३ तलावात पाणी आलेले नाही. पाण्याचा साठा सरासरी २३ टक्के इतका आहे.

चार जिल्ह्य़ात चांगला पाऊस

विभागातील ८ जिल्ह्य़ांपैकी ४ जिल्ह्य़ात सरासरी ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस आहे. जालना ४६२.९५ मि.मी. (६७.२६ टक्के), हिंगोली-५९७.७० मि.मी. (६६.९५ टक्के), नांदेड-६३४.६१ मि.मी. (६६.४१ टक्के), लातूर-५२३ मि.मी. (६५.२१ टक्के) इतका पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्य़ांतील पिके बहरली आहेत. औरंगाबादमध्ये ३८८.४९ (५७.५१ टक्के), परभणी ४२६.२१ मि.मी. (५५ टक्के), बीड ३२७ मि.मी. (४९ टक्के), उस्मानाबाद ३८५.२३ मि.मी. (४९.५९ टक्के) पाऊस झाला आहे.