शहरातील एका प्रमुख बांधकाम व्यावसायिकाच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून २५ कोटी रुपयांची थकबाकी बँकेने वसूल करावी, असा आदेश जिल्हा न्यायाधीश एस. जी. शेट्टे यांनी दिला आहे. बुलढाणा अर्बन को, ऑप. बँकेकडून जुगलकिशोर छगनलाल तापडिया, संजय सुगचंद कासलिवाल, पद्मा जुगलकिशोर तापडिया, व मेघा संजय कासलिवाल यांनी ९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड न केल्याने संपत्तीवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याचा जाहीर लिलाव करून थकबाकी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील बीड बायपास रोडवरील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ ‘कासलीवाल एम्पायर’ गृहसंकुल उभारण्यासाठी ९ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये वितुष्ट आल्यामुळे त्यांनी बँकेचा एकही रुपया भरला नाही.

दरम्यान घेतलेल्या कर्जातून १६८ सदनिका, ५४ रो हाऊस व २६ बंगले उभारण्यात आले होते. मात्र, घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी भरली नाही. बुलढाणा अर्बन को. ऑप. बँकेच्या वतीने वारंवार नोटिसा देऊनही रक्कम दिली जात नसल्याने न्यायाधिकरणाने गहाण ठेवलेल्या संपत्तीवर टाच आणण्याची मुभा दिली होती. त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी बँकेने जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता.

बँकेच्या बाजूने जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला आहे. बँकेचे वकील म्हणून वैभव देशमुख यांनी काम केले.