एकीकडे जलयुक्त लातूरसारखे आदर्श काम होत असताना दुसरीकडे ४० वर्षांपूर्वी उभारलेल्या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील १०८ झाडे इतिहासजमा होत आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांनी टाऊन हॉलच्या मदानानजीक हे मनोहर उद्यान विकसित केले होते. कालांतराने बागेत फिरणाऱ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली. मुलांना खेळण्याची उपकरणे बसवण्यात आली. लातूरकरांसाठी एक उत्तम बाग असे त्याला स्वरूप प्राप्त झाले होते.

या वर्षी दुष्काळामुळे व पाणीटंचाईच्या कचाटय़ात सापडलेल्या लातूर मनपाचे व कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचे या बागेकडे लक्ष गेले नाही. परिणामी, आता या बागेला ओसाड रूप प्राप्त झाले आहे. ४० वर्षांपूर्वीची झाडे बुडापासून शेंडय़ापर्यंत करपून गेली आहेत. नारळाच्या झाडांना खुंटाडाचे स्वरूप आले आहे. २० वर्षांपूर्वी लोकाग्रहास्तव या उद्यानाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान असे करण्यात आले. उद्यानात वृक्ष मोठे असल्यामुळे उन्हाळय़ाच्या दिवसांत सावलीसाठी पांथस्थांना वृक्षांचा आसरा मिळत असे. सावलीखाली बसण्यासाठी लोकांची दिवसभर गर्दी असायची. सकाळी, सायंकाळी झाडावर हजारो पक्ष्यांची शाळा भरायची. त्यांचा किलबिलाट ऐकू यायचा. रम्य वाटायचे. या वर्षी पिण्याच्या पाण्याच्या वितरणात लोकांच्या क्षोभाला तोंड देण्यात पालिकेच्या कोणाही अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष बागेतील वृक्ष वाचवण्यासाठी पाणी देण्याकडे गेले नाही. राजीव गांधी चौक ते बाभळगाव नाका या रस्त्याच्या दुभाजकात तथाकथित विकसित केलेल्या बागेला टँकरने पाणीपुरवठा करण्यात पालिकेला ‘रस’ होता, मात्र ४० वर्षांपासूनच्या सांभाळलेल्या वृक्षांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता, असे मत आता व्यक्त होत आहे.

शिवसेना, भाजपच्या नेत्यांच्या सभा बागेच्या शेजारी असलेल्या मदानावर झाल्या. पाणीप्रश्नी भाषणेही त्यांनी ठोकली, मात्र या प्रश्नाकडे लक्ष गेले नाही. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था कोणाचेही लक्ष नाही. जयंती, पुण्यतिथीनिमित्ताने महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून पुरोगामित्व पदरी पाडून घेणाऱ्यांनाही या वृक्षाची हाक ऐकू आली नाही. गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाच्या आजूबाजूची झाडेही वाळून गेली व गांधींजीच्या पुतळय़ाप्रमाणेच त्या वृक्षाकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. या उद्यानाच्या निगराणीसाठी एक अधिकारी व चार कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांनी या वर्षी उन्हाळाभर नेमकी काय निगराणी केली, असा प्रश्न विचारला जात आहे.

१५ वर्षांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मदानावर रोपलागवड करण्यात आली. या वर्षी तेथील झाडेही वाळून जात होती. िवधनविहिरीचे पाणी आटल्यामुळे क्रीडा विभाग ‘बजेट’ नाहीचे उत्तर देत होते. त्यामुळे दररोज पहाटे फिरायला येणाऱ्या मंडळींनी पसे गोळा करून आजवर सुमारे ३० टँकर (१ लाख ८० हजार लीटर) पाणी विकत घेऊन झाडाला घातले. अशा उन्हाळय़ात ती झाडे हिरवीगार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत वाहती गटार आहे. त्या सांडपाण्याचा वापरही झाडे वाचवण्यासाठी करता आला असता. शहरात अनेक ठिकाणी असे प्रयोग या वर्षी करण्यात आले आहेत.