येथील आयकॉन सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमोद घुगे यांनी रेणापूर तालुक्यातील सचिन पवार या २२ वर्षीय तरुणाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. औरंगाबादच्या धूत रुग्णालयात हे उपचार करण्यात आले. सचिन व त्याची आई दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी व बीदर या जिल्हय़ांत अशी शस्त्रक्रिया करणारे डॉ. घुगे एकमेव आहेत. या भागातील रुग्णांना मोठय़ा शहरांत किडनी प्रत्यारोपणास जावे लागत असे. डॉ. घुगे यांच्याकडे राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू आहे. सचिन पवार याची आर्थिक स्थिती बेताची असून या योजनेंतर्गत सरकारकडून दीड लाख रुपये मिळाले. सचिनच्या आईने किडनी दिली व धूत रुग्णालयात डॉ. घुगे यांनी सचिनवर शस्त्रक्रिया केली. डॉ. घुगे यांनी अहमदाबादेत ४ वष्रे कार्यरत असताना किडनी प्रत्यारोपणाच्या सुमारे २ हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. वर्षभरात लातूर येथे किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करणार असल्याचे ते म्हणाले. किडनी प्रत्यारोपण अतिशय खर्चिक असते. त्यामुळे सामान्य मंडळी या बाबत घाबरून जातात. एका किडनीवर आयुष्य काढता येते, असे अनेक रुग्ण आहेत. सचिन व त्याची आई दोघांनाही घुगे यांनी विश्वासात घेतले व ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
कुस्तीगीर डॉक्टर!
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे डॉ. प्रमोद घुगे यांचे गाव. वडील पट्टीचे कुस्तीगीर. लहानपणापासून प्रमोद यांना कुस्तीचे शिक्षण मिळाले. बारावीपर्यंत प्रमोद यांनी व्यावसायिक कुस्तीमध्ये सहभाग घेतला. बारावीला असताना राज्यस्तरीय कुस्ती स्पध्रेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला होता. कुस्तीची आवड त्यांनी अजूनही जोपासली आहे. महिनाभरापूर्वी अणदूर येथे पार पडलेल्या खंडोबा यात्रेत या ३५ वर्षीय किडनीविकारतज्ज्ञाने कुस्तीमध्ये प्रावीण्य दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ असताना शहरी भागात व्यावसायिक संधी मोठय़ा उपलब्ध असतात. मात्र, ग्रामीण भागात ज्या रुग्णांना ही सेवा दुरापास्त असते, त्यांच्यासाठी आपण काही करावे, याच भावनेतून लातूर येथे गेल्या वर्षभरापासून आपण कार्यरत असल्याचे डॉ. घुगे यांनी सांगितले.