‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ? या मुंबईच्या रस्त्याची पोलखोल करणाऱ्या आरजे मालिष्काच्या गाण्याला नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झाला. सध्या राज्यभर या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईत रस्त्याच्या खड्डयावरून चर्चेत आलेल्या गाण्याच्या टोनमध्ये भाजपने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादमधील पालिकेच्या सर्व साधारण सभेत रस्ते कामासाठी मंजूर झालेल्या निधीच्या श्रेयवादावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी शिवसेना नगरसेवकांना डिवचले.  शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटींचा निधी आला आहे. यावरुन सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नेत्याच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने मांडला. यापूर्वीच्या सभेत शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा शिवसेनेकडून अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी आम्हीच ठराव मांडणार होतो. मात्र यांना आमच्यावर भरोसा नाय, असं सांगत ‘सोन्या तुझा आमच्यावर भरोसा नाय काय?’ असा सवाल करुन शिवसेनेवर कोटी केली. तसेच शिवसेना नगरसेवकांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन दिलं. निधीच्या श्रेय वादावरून हा सर्व प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.