मराठवाड्याच्या मुक्तीसाठी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रझाकारांविरोधात लढा उभारला गेला. त्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. अनेक स्वातंत्र्यसैनिक मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढले. त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, आता मराठवाड्यात विकासाचा लढा लढावा लागेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादमध्ये रविवारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नारपार चिंजाळ येथून ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यात येईल. त्यासाठी वॉटर ग्रीडचे काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली असून याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीक विम्यात मराठवाड्याला मोठी मदत झाली. देशात सर्वाधिक पीक विम्याचा लाभ मराठवड्याला मिळाला. तसेच कर्जमाफीला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी नोंदणी केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

मराठवाड्यात उद्योगाला चालना मिळवी यासाठी वीजदरात सवलत देण्यात आली आहे. डीएमआयसी प्रकल्प जलदगतीन राबवला जात असून त्या अंतर्गत उभारण्यात येणार्‍या ऑरिक सिटी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही फडणवीस म्हणाले.