जिल्ह्यातील २२२ दगडखाणींपकी ८९ खाणींमधून खनिजांचा अतिरिक्त उपसा झाल्याचा अहवाल निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या पथकाने दिल्यानंतर खाणमालकांकडून पाचपट दंड वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिले.
दगडखाणींतून अधिक उपसा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी प्रशांत शेळके यांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. २४ खाणींची मोजणी केल्यानंतर डोंगर पोखरून कोटय़वधींची लूट होत असल्याचे समोर आले. त्यानंतर दगडखाण मालकांनी वापरलेली वीज आणि केलेला उपसा याचे गणित मांडत जिल्ह्यातील २२२ खाणींची मोजणी करण्यात आली. यात ८९ खाणींमधून बेसुमार उपसा झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारी व गायरान जमिनीवरील खाणींमधून होणारा उपसा झालेला असल्याने स्वामित्व हक्काच्या पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानाधारकांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आल्याचे सोरमारे यांनी सांगितले. जसजसे अहवाल प्राप्त होतील, तसतशी कारवाई केली जाणार आहे.