मन्नरवारलू संघर्ष समितीकडून आंदोलनाचा इशारा

महादेव कोळी व मन्नरवारलू या समाजातील तरुणांना जात प्रमाणपत्र मिळविण्यास सहा वर्षांपासून जात पडताळणी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. या समाजावर अन्याय होत असल्याने दोन तरुणांनी नुकतीच जात पडताळणीच्या सहायक आयुक्तांवर शाईफेक केली होती. या पाश्र्वभूमीवर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी मन्न्ोरवारलू संघटनेचे प्रवीण जेठेवाड यांनी दिला आहे.

केंद्र सरकारच्या १९५०, १९५६ व १९७६ या तीनही गॅझेटमध्ये मराठवाडय़ातील सर्व जिल्हय़ांत महादेव कोळी व मन्न्ोरवारलू ही जमात राहते, असे नमूद केलेले आहे.

अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहायक आयुक्त ई. जी. भालेराव, वरिष्ठ संशोधन अधिकारी जे. व्ही. कुमरे यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत जेठेवाड म्हणाले, की जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहे. शिक्षण व नोकरीपासून या समाजातील तरुणांना दूर ठेवण्याचे षडयंत्र यामागे असावे, असा आरोप जेठेवाड यांनी केला आहे. यामागे विदर्भातील आदिवासी आमदार व आंध, भिल्ल व गोंड या समाजाच्या संघटनेच्या पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. मन्न्ोरवारलू व महादेव कोळी हा शब्द इंग्रजीत लिहिताना स्पेलिंगमध्ये केलेल्या चुकांमुळे प्रमाणपत्र पडताळणी समिती निर्णय घेत नाही. यावर राज्य शासनही उपाययोजना करत नाही. अनुसूचित जातीची इंग्रजी व मराठीतील यादी सर्व शाळांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जात पडताळणीच्या उपाध्यक्षांनी त्यांच्या दालनात प्रमाणपत्र मागण्यांसाठी आलेल्या दोन तरुणांना शिवीगाळ केल्यामुळे शाईफेकीचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.