भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध दर्शवल्यामुळे पंकजा मुंडे दसरा मेळावा कोठे घेणार याची जोरदार चर्चा सुरु होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. यंदाचा दसरा मेळावा संत भगवान बाबांच्या जन्मभूमीत म्हणजेच सारगाव येथे होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, कर्मभूमी नाही तर जन्मभूमी बोलावतेय, जन्मस्थळाची माती कपाळी लावून नवीन अध्याय सुरू करते, दसऱ्या मेळाव्याला येत आहे.  भगवान बाबांचे जन्मगाव बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.

यापूर्वी भगवान गडावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी माहेरची भेट म्हणून फक्त वीस मिनिट द्या, असे भावनिक पत्र पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना लिहिले होते. त्यानंतरही नामदेव शास्त्री आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा मेळावा गडाच्या पायथ्याला होणार असल्याची चर्चा रंगली होती.