एटीएममधील बदलासाठी तंत्रज्ञांची कमतरता

चलनातून बाद ठरवलेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांनी बँकांच्या तिजोऱ्या भरल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाखांमधून या नोटा पाठवू नयेत, त्या साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे निरोप देण्यात आले आहेत. एका बाजूला जुन्या नोटांनी ‘चेस्ट’ भरलेले आहेत आणि आवश्यक नोटांचा पुरवठाच न झाल्याने एटीएममध्ये पैसे भरले की ते संपण्याचा कालावधी तीन तासांवर आला आहे. १०० रुपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकण्यासाठी यंत्र व सेन्सरमध्ये करावयाच्या बदलासाठी आवश्यक त्या संख्येत तंत्रज्ञही उपलब्ध नाहीत. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरलेल्या तिजोऱ्यांमुळे नोटा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची बाब मान्य केली. या नोटा रिझव्‍‌र्ह बँकेकडे कशा द्यायच्या, याबाबतही सूचना अद्यापि आलेल्या नाहीत.

खात्यात जुन्या चलनातून बाद केलेल्या नोटा भरण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. या नोटा बँकांच्या तिजोरीच्या क्षमतेपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे काही बँकांमध्ये पोत्यात नोटा भरून तिजोरीच्या बाहेर ठेवल्या जात आहेत. अर्थात त्याला पहारा आहे. पण ग्रामीण भागातून येणाऱ्या नोटा यापुढे मुख्य कार्यालयाकडे पाठवू नयेत. त्या तेथेच साठवाव्यात, असे निरोप देण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएममध्ये नवीन दोन हजारच्या नोटा ठेवण्यासाठी एटीएमच्या कॅसेटमध्ये करावे लागणारे छोटे बदल करण्यासाठी पुरेसे तंत्रज्ञ, अभियंते उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

औरंगाबाद जिल्हय़ात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम एनसीआर, डायबोल्ट, हायसंग, व्होरटॅक्स या कंपन्यांच्या आहेत. एटीएममध्ये बदल करण्यासाठी एनसीआर कंपनीचा केवळ एक अभियंता आहे. मुंबई-पुण्यात हे काम जवळपास मार्गी लागले असल्याने तिकडचे २० अभियंते मराठवाडय़ात द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. पुरेशा नोटा नसणे, एटीएममधून त्या बाहेर निघाव्यात, अशी व्यवस्था करणे तसेच नोटा बदलण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे रांगा वाढल्या. गेल्या दोन दिवसांत शंभर रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाकल्यानंतर ते काढून घेण्याचा कालावधी केवळ तीन तासांवर आला आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बँकांनी वेगळय़ा एजन्सीला दिलेले आहेत. एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी या संस्थेकडे रोकड वाहून नेणारी वाहने कमी आहेत. वाहने उपलब्ध झाली तरी वाहनांबरोबर एक बंदूकधारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. एवढय़ा तातडीने परवानाधारक बंदूकधारी आणि वाहन मिळत नसल्यामुळे एटीएममध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा रोकड टाकणे अवघड होऊन बसले आहे. ही तजवीज नसताना पैशाचे व्यवहार केल्यास त्याला विमा लागू नसल्याने कोणतीही बँक धोका पत्करत नाही. तरीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्न करून काही एटीएम सुरू केल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद शहरात दोन हजार रुपयांच्या नोटा एटीएममधून काढता येतील, असे ३७ एटीएम केंद्र स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केले आहेत. या बँकेतला मराठवाडय़ातील एटीएमचा आकडा ५२० एवढा आहे.

३० लाख, तीन लाख, तीन तास

सर्वसाधारणपणे एटीएममध्ये ३० लाख रुपये भरले जातात. केवळ १०० रुपयांच्या नोटा आता भरल्या जात असल्याने एका एटीएममध्ये साधारण तीन लाख रुपये बसू शकतात. ते तीन तासांत संपून जातात. ग्रामीण भागात तर ही अवस्था अधिकच वाईट आहे.

‘‘ग्रामीण व शहरातून ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा मोठय़ा प्रमाणात बँकेत आल्या आहेत. एटीएममधून अधिक लोकांना पैसे मिळावेत, अशी व्यवस्था केली जात आहे. बँकेचे अधिकारी अक्षरश: रात्रंदिवस काम करत आहेत, असे म्हटले तरी चूक होणार नाही. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेकडून आवश्यक त्या प्रमाणात पैसे मिळालेले नाहीत. आलेली रक्कम ‘नगण्य’ या श्रेणीत मोडता येईल, एवढी कमी आहे. त्यामुळे अडचणी आहेत.’’  – दिनकर बी.संकपाळ बँक ऑफ महाराष्ट