औरंगाबादमध्ये झाड अंगावर कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद राधेश्याम करंडीवाल (वय ३०) असं मृत तरुणाचं नाव आहे. बनेवाडीतील परिसरातील तो नावाजलेला क्रिकेटपटू होता. त्याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. गावातील मित्रमंडळी त्याला जॉन्टी नावाने हाक मारायचे.

रविवारी रात्री संततधार पाऊस सुरु होता. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साठले होते. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग शोधण्यासाठी कसरत करावी लागत होती. सखल भागात शिरलेले पाणी उपसण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील अयोध्यानगरीच्या मैदानातून बनेवाडीकडे चिंचोळ्या मार्गाने विनोद करंडीवाल हा दुचाकीने जात होता. स्मशानभूमीपासून जाणाऱ्या रस्त्यावर चिखल असल्याने त्यातून विनोद मार्ग काढत होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर भले मोठे बाभळीचे झाड कोसळले. त्यामुळे दुचाकी जागेवरच थांबत अंगात काटे शिरुन जीव गुदमरत त्याचा दुर्दैवी अंत झाला.

रस्त्यावर अंधार आणि झाड कोसळल्याचे पाहून बनेवाडीकडे जाण्यासाठी गावकऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. याचवेळी तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बाभळीच्या झाडाखाली दुचाकी दबल्याचे दिसून आले. त्यावरुन त्याने रात्री एकच्या सुमारास गावकऱ्यांना याची माहिती दिली. त्यामुळे काही गावकरी घटनास्थळी धावत आले. त्यांनी घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना दिल्यानंतर जमादार उत्तम जाधव, योगेश सूर्यवंशी यांनी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दुचाकीवरील झाड रस्त्या कडेला काढले. त्यावेळी झाडाखाली विनोदचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विनोद हा उत्तम फलंदाज होता. याशिवाय तो गॅस एजन्सीमध्ये मार्केटिंगचे काम करायचा.