राज्यातील १० महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी आज सरासरी ५६.३० टक्के मतदान झाले तर, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६९.४३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगर पालिकेची मतदानाची टक्केवारी ५५ टक्के आहे, ठाणे महानगर पालिकेची टक्केवारी ५८ टक्के आहे, उल्हासनगर ५० टक्के, पुणे ५४ टक्के, पिंपरी-चिंचवड ६७ टक्के, सोलापूर ६०, नाशिक ६०, अकोला ५६ टक्के, अमरावती ५५ टक्के, नागपूर ५३ टक्के आणि एकूण मतदानाची सरासरी ५६.३० टक्के असल्याचे सहारिया यांनी सांगितले. आज सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात ४ पंचायत समित्या आणि त्याअंतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतची मतदानाची वेळ होती.

प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदांच्या मतदानाची टक्केवारी

रायगड- ७१ टक्के, रत्नागिरी- ६४ टक्के, सिंधुदुर्ग -७० टक्के, नाशिक- ६८, पुणे- ७० टक्के, सातारा- ७० टक्के, सांगली- ६५ टक्के, सोलापूर- ६८ टक्के, कोल्हापूर- ७० टक्के, अमरावती- ६७ टक्के, गडचिरोली- ६८ टक्के
मागील निवडणुकांमध्ये सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ६८ टक्के मतदान झाले होते. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली.

जिल्हा परिषदांच्या तीन हजार २१० जागांकरिता १७ हजार ३३१ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदा, आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, तसेच गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समित्यांमध्ये आज मतदान झाले. वर्धा जिल्हा परिषदेच्या दोन आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा जागांबरोबरच त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या १६ जागांसाठीही मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६५४ जागांसाठी दोन हजार ९५६ तर पंचायत समित्यांच्या एक हजार २८८ जागांसाठी पाच हजार १६७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला गुरुवारी होणार आहे.