मातेचे दूध न मिळाल्यामुळे जगात १३ लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबविली जाते. जगभर ५१७ मातृदुग्ध पेढय़ा कार्यरत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनिसेफच्या संयुक्त विधानाप्रमाणे जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ  शकत नाही अशा बाळास आपल्याच मातेचे काढलेले किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम आहे.

  • भारतात सध्या १३ मातृदुग्ध पेढय़ा असून त्यापैकी मुंबईत पाच आहेत. त्यामध्ये जे.जे. रुग्णालय, सायन रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, ठाणे, के.ई.एम. रुग्णालय, नायर रुग्णालय यांचा समावेश आहे.
  • इतर मातृदुग्ध पेढय़ा गोवा, बडोदा, सुरत, हैदराबाद, होशगाबाद, उदयपूर व पुणे येथे बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अशा दोन मातृदुग्ध पेढय़ा पुण्यात आहेत.
  • ही एक अशी संस्था आहे जिथे दान केलेल्या मातृ दुधाचे संकलन, तपासणी, प्रक्रिया, साठवण वाटप केले जाते. हे दूध अशा बालकांसाठी वापरले जाते ज्यांचे या मातांशी कुठलेही नाते संबंध नसतात.

मातृदुग्ध कोण दान करू  शकतात?

  • दुग्धन आई जिला अतिरिक्त दूध येते व जिला कुठलाही संसर्गजन्य रोग नसावा. (उदा. एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, सी, सिफीलीस, क्षयरोग).
  • अकाली जन्माला आलेल्या बाळांचे माता, आजारी बाळांच्या माता, अशा माता ज्यांनी हल्लीच आपल्या बाळाला काही कारणास्तव गमावले आहे.

लाभार्थी कोण आहेत

  • अति धोका असलेले नवजात बाळ (मुदतपूर्व जन्म झालेले बाळ, कमी वजन असलेले बाळ) जे बाळ आपल्या आईपासून प्रसूतीनंतर दूर झाले आहे.
  • माता ज्यांचे स्तनाग्र सपाट किंवा अधोमुख आहेत.
  • माता ज्यांनी जुळे, तिळे किंवा चतुष्क बाळांना जन्म दिले असेल.
  • दुग्धन नसलेली माता जिने नवजात बाळाला दत्तक घेतले असेल.

अधिक माहितीसाठी – https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=d+IFWixcjfw