‘शहाणं’ आणि ‘वेडं’च्या मध्ये एक ‘भानासकटचं उतू जाणं’ नावाचा प्रदेश असतो. त्या प्रदेशात आतलं काहीसं उतू जात असतं. पण तरी आपणच आपल्याला सावरू शकण्याची मुभाही असते. इथे, उपचार मदत करू शकतो. इथे जर स्वत:ला सावरलं नाही तर हळूहळू कदाचित मन दमून जात असेल. ताण घेऊन घेऊन आणि मग खूप ताणलं की तुटतं तसं भान सुटत असेल एके दिवशी.. अशी अनेक कमी-अधिक उतू जाणारी मनं मला आसपास दिसत आहेत..
मी दुसरीत असेल तेव्हा. सातारच्या ‘गेंडामाळ’ नावाच्या भागात राहायचो आम्ही. शाळा सकाळची असायची. दुपारी साडेबाराच्या दरम्यान मी परत यायचे. माझा धाकटा भाऊ जय तर अजून पिल्लूच होता. त्यामुळे त्याला शाळा नसायची. घरीच असायचा. दुडुदुडु इकडे-तिकडे पळायचा. आम्ही दोघं दुपारभर खूप भांडत भांडत छान धुडगूस घालायचो. दुपारचं जेवण झालं की आई थोडा वेळ जयला झोपवायची. मी झोपले तर झोपायचे नाही तर काहीबाही करत राहायचे. दुपार रेंगाळत राहायची. मी कधी स्वयंपाकघरातल्या खिडकीतनं बाहेर बघत राहायचे, कधी आमच्या कॉलनीतल्या रस्त्यावर बाहेर पडायचे. नि:स्तब्ध, शांत, दुपारचा रस्ता. मातीचाच होता. तो रस्ता मुख्य डांबरी रस्त्याला मिळायचा तिथे, त्या कोपऱ्यावर एक पांढरा सिमेंटचा पाइप पडलेला होता. गोल सुरळीसारखा. आम्ही त्या कॉलनीत भाडय़ाने राहायला आल्यापासून तो तिथेच असलेला आठवतो. एके शांत दुपारी आई, जय झोपलेले असताना मी इथे-तिथे रेंगाळत अशीच घराबाहेर पडले. रमत-गमत दहा-पंधरा पावलांवर असलेल्या त्या पाइपपाशी आले. त्या पाइपवर मला ‘ती’ बसलेली दिसली. तिशीची असेल. काळी होती. तिच्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. ती थंड नजरेनं एक प्राणी असल्यासारखी त्या पाइपवर बसलेली होती. मी तोवर कधीच इतक्या मोठय़ा झालेल्या माणसाचं विवस्त्र शरीर पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे ‘ती’ समोर दिसताच भीतीच्या आधी कुतूहल वाटलं. मी माझ्या लहान, अज्ञानी डोळ्यांनी आधी तिच्या शरीराकडे नुसतीच पाहत राहिले. तिला तिच्या विवस्त्र असण्याची लाज तर दूरच यत्किंचितही जाणीव नव्हती. त्यामुळे मीही तिच्याकडे मोकळेपणानं पाहू शकत होते. तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. एका क्षणी तिची थंड बर्फाची नजर माझ्या दिशेने वळली आणि माझा बर्फ झाला. ती खरं तर जागची उठलीही नव्हती तरी मी किंचाळले आणि घराच्या दिशेने पळत सुटले. घरापाशी पोचता पोचता घाबरून मागे पाहिलं तर ती ढिम्म तशीच त्या पाइपवर बसून होती. तिचे ओठ काहीतरी पुटपुटत होते.
त्या पुढचे कितीतरी दिवस ती कॉलनीच्या रस्त्यावर कुठे कुठे दिसायची. बऱ्याचदा त्या पाइपवरच. तिच्या अंगावर कधी कधी कुणी कुणी चढवलेले कुठलेही कपडे असायचे. कधी शर्ट आणि लुंगी, कधी आणखीन काही. थोडय़ाच वेळात तिनं ते कपडे काढून टाकलेले असायचे. कधी कधी ती विवस्त्रच त्या पाइपवर हातात भाकरी घेऊन खाताना दिसायची. कधी तरी सकाळी तिच्या हातात एक फुटका लाल तांब्या दिसायचा. मधेच ती गायब व्हायची. सकाळी दिसायचीच नाही. दुपारी अचानक अवतरायची. एके संध्याकाळी मी आणि जय बाहेरच्या खोलीतल्या खिडकीत भांडत होतो कशावरून तरी. अंधार पडत चालला होता. अचानक त्या अंधारातून दोन हात आले आणि त्यांनी जयचा गोरागोबरा चेहरा ओंजळीत घेतला. मी किंचाळलेच. ‘ती’ खिडकीत उभी होती. जयचा चेहरा हातात घेऊन ‘माझा बाबूऽऽ’ असं काहीसं विचित्र आवाजात चित्कारत रडल्यासारखं म्हणत होती. माझ्या ओरडण्यानं ती दचकली. रात्रीच्या अंधारात मी आणि जयनं खिडकीबाहेर पाहिलं. ती काळी, पिंजारलेले केस, अंधारात तिचे डोळे भेसूर चमकले. जय ‘आईऽऽ’ म्हणून ओरडायला लागल्यावर ती झपझप तिथून काहीसं पुटपुटत निघून गेली. त्यानंतर दोन दिवस मी जयला ‘तू तिचा बाबू आहेस आणि ती तुला पळवणार’ असं सांगत घाबरवत होते. तिसऱ्या दिवशी ती गायब होती. मला वाटलं संध्याकाळपर्यंत उगवेल परत. तिच्या असण्या-नसण्याची आता सवयच व्हायला लागली होती. पुढचा पूर्ण दिवस तसाच गेला. मी आईला म्हटलं, ‘ती वेडी बाई कुठं दिसत नाहीये.’ तर आई हळहळत म्हणाली, ‘घेऊन गेले तिच्या घरचे तिला. खूप शोधत होते म्हणे कुठे कुठे..’ नंतर शेजारचं कुणीसं आईला सांगताना मी ऐकलं, ‘मुलगा वारला म्हणे तिचा, तेव्हापासून बिचारी अशी सारखी घर सोडून जाते. तिची आई तिला मिठी मारून फार रडत होती.’
माझ्या एका मित्राचं एका मुलीबरोबर अनेक वर्षे असलेलं नातं तुटलं. सैरभैर झाला. सारखं तिच्याविषयीच बोलत राहायचा. असेच दिवस जात राहिले. त्यानं काम करणं सोडलं नाही. त्याला कुणी तरी मानसोपचारासाठी जायला सांगितलं. गेला. हळूहळू सावरला. परवा मला म्हणाला, ‘त्या काळात मला वाटायचं, मला वेडच लागेल.. वाचलो मी..’
माझा एक मित्र आणि त्याची बायको यांच्यात कडाक्याची भांडणं होतात. तिचा राग तिला आवरत नाही. ती वस्तू इकडे-तिकडे फेकते. किंचाळते. कुणीसं तिला म्हटलं, ‘एवढा त्रास करून घेण्यापेक्षा एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाला का भेटत नाहीस?’, तर ती पटकन म्हणाली, ‘मी वेडी नाहीये मानसोपचार घ्यायला!’ कितीही सुशिक्षित घर असलं तरी मानसोपचार म्हणजे कुणीसा डॉक्टर कॉटला बांधून आपल्याला शॉक देणार किंवा गोळ्या देणार असंच ढोबळ काहीसं वाटत राहतं. वेडाच्या प्रदेशात गेलेलं माणूस मानसोपचाराच्याही बऱ्याचदा पल्याड निघून गेलेलं असतं. उपचारासाठी स्वत:च्या मनाचं, असण्याचं भान लागतं. कित्येकदा तेच सुटून गेलेलं असतं. माझ्या कॉलनीतल्या त्या विवस्त्र बाईसारखे. ‘ती’ही आधी तुमच्या माझ्यासारखीच ‘शहाणी’ असेल. तिचा एक संसार, एक गोड बाळ.. काही कारणानं तिचं इटुकलं तिला सोडून गेलं आणि तिच्या आतलं काहीसं तुटून गेलं. सिनेमात दाखवतात तसं एका क्षणात, एका दिवसात झालं का हे? मग ती वेडी झाली? मला वाटतं ते हळूहळू होत जात असेल. ‘शहाणं’ आणि ‘वेडं’च्या मध्ये एक ‘भानासकटचं उतू जाणं’ नावाचा प्रदेश असतो. त्या प्रदेशात आतलं काहीसं उतू जात असतं. पण तरी आपणच आपल्याला सावरू शकण्याची मुभाही असते. इथे, उपचार मदत करू शकतो. इथे जर स्वत:ला सावरलं नाही तर हळूहळू कदाचित मन दमून जात असेल. ताण घेऊन घेऊन आणि मग खूप ताणलं की तुटतं तसं भान सुटत असेल एके दिवशी.. अशी अनेक कमी-अधिक उतू जाणारी मनं मला आसपास दिसत आहेत. त्यांचं उतू जाणं त्यांच्या भोवतीच्या प्रेमाच्या माणसांनाच भोगावं लागतं आहे. त्यामुळे अनेक नाती दुखावताना दिसत आहेत. हे सगळं नाजूक आहे. पटकन् कुणा एकाला दोष देऊन विसरता येणार नाही. हे थांबवण्यासाठी आपण आपल्यापाशी यावं लागेल. ते भीतिदायक असू शकतं, पण तरी करावंच लागेल. मला त्यासाठी कुठलीच पळवाट, पर्याय दिसत नाही.
मला माझ्यापाशी ‘मानसोपचारानं’ आणलं. माझ्या आयुष्यात आलेल्या एका फार मोठय़ा माणसानं मला ‘मानसोपचार’ या शास्त्राची वाट दाखवली. तो माणूस सर्वार्थाने मोठा होता. वयानं, नावानं. त्याच्या प्रसिद्ध, वयस्क आयुष्यात त्यानं अनेक संकटांचे वार झेलले. एखाद्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक एवढी संकटं कशी येतील? असा दु:खद अचंबा वाटायला लावणारं त्याचं आयुष्य होतं. तरीही तो शेवटपर्यंत विवेकाला न सोडता समतोल जगला, ‘मी दु:खापाशी थांबून राहतो.’ म्हणत राहिला. मला म्हणायचा, ‘तुझ्या चेहऱ्यावर हे असं आठय़ांचं जाळं का असतं? तू हसलीस की एक क्षण ते जाळे नाहीसे होऊन तुझा चेहरा उजळतो. पण हसणं संपलं की पुन्हा तो आठय़ांनी झाकोळून जातो.’ त्याला माझ्या आयुष्यातले सगळे ताण माहीत होते. ताण कुणाला नसतात.. एके दिवशी तो म्हणाला, ‘हा नंबर घे. मी यांच्याकडे मानसोपचारासाठी जात होतो. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपलं दु:ख सांगणं वेगळं, मानसोपचार आपल्या दु:खाकडे आपल्याला तटस्थपणे पाहायला शिकवतो आणि कुठल्याही दु:खातून बाहेर पडण्यासाठी ते फार महत्त्वाचं असतं.’
मी त्या तज्ज्ञांकडे गेले तो दिवस माझ्या आयुष्यातल्या एका मोठय़ा बदलाची सुरुवात होता, असं आता वाटतं. मी कुठल्याही औषधांवर नव्हते आणि नाही. माझा तज्ज्ञ सांगणार आणि मी ऐकणार हेसुद्धा या उपचार पद्धतीत नाही. त्या ‘ई.एम.डी.आर.’ नावाच्या तंत्रानं माझ्यावर उपचार करतात. या आद्याक्षरांचं संपूर्ण रूप- ‘आय मूव्हमेंट डिसेन्सटाइझेशन अँड रिप्रोसेसिंग’ असं आहे. फ्रॅंकाइन श्ॉपिरो नावाच्या तज्ज्ञानं ही पद्धत शोधून काढली. या विषयावरची वेबसाइटपण आहे. आपल्या डोळ्यांची उजवीकडे- डावीकडे- उजवीकडे अशा स्वरूपाची हालचाल केली की आत छापून ठेवलेलं लहानपणापासूनचं बरंच काही वर येऊ पाहतं. ते वर आलेलं समोर ठेवायचं. त्याला चिकटलेली भूतकाळाची लक्तरं निगुतीनं बाजूला काढायची आणि भूतकाळापासून स्वत:ला प्रेमानं सोडवून मोकळ्या मनानं वर्तमानाला सामोरं जायला शिकायचं असं काहीसं माझ्या उपचारांचं थोडक्यात आणि ढोबळ वर्णन करता येईल. प्रत्येक तज्ज्ञ उपचारासाठी या तंत्राचा वापर करेलच असं नाही. हेच तंत्र बरोबर असंही नाही. पण मला स्वत:ला या तंत्रानं खूप काही शिकवलं. या तंत्रात मानसोपचारतज्ज्ञावर पूर्णपणे अवलंबून राहणं नाही आहे. हे मला आवडतं. आपलं वजन आपणच उचलायचं आहे. तज्ज्ञ फक्त कुठल्या तंत्रानं उचललं तर दुखापत होणार नाही हे सांगणार. या तंत्रानं माझ्या आतल्या कितीतरी अंधाऱ्या, दुर्लक्षित, लपवलेल्या, न आवडणाऱ्या कानाकोपऱ्यांना माझ्यासमोर प्रकाशात आणलं. त्या सगळ्याकडे पाहण्याचं बळ दिलं. माझं स्वत:पासून पळणं थांबवलं. माझा माझ्याबरोबर सुरू झालेला हा प्रवास कायम चालू राहील. या प्रवासात ‘मी अल्बर्ट एलिस’ नावाच्या पुस्तकासारखे अनेक सोबती भेटत आहेत. या प्रवासात पुढे जाणं आहे, पुन्हा पहिल्यापासून सुरू करणं आहे. पुन्हा पुन्हा पळू पाहणं आहे. पळणाऱ्या स्वत:चा हात स्वत:च धरून स्वत:लाच सामोरं जायला लावणं आहे. या उपचारात काय काय आहे ते सांगणं कठीण आहे. एका प्रसंगाचा आधार घेते. एके दिवशी मी माझ्या उपचारतज्ज्ञांबरोबर त्यांच्या केबिनमध्ये बसून उपचार घेत होते. त्या केबिनच्या खिडकीबाहेर एक चिमणी होती. तिला त्या खोलीत यायचं असावं. तिला त्या खिडकीची काच दिसतच नव्हती. ती पुन्हा पुन्हा त्या बंद खिडकीच्या काचेवर आदळून आदळून तिथूनच आत यायचा प्रयत्न करत तडफडत होती. स्वत:ला दुखवतही होती. मला वाटतं उपचाराआधीचं माझं आयुष्य काहीसं असं होतं. त्याच त्याच गोष्टीवर आदळून स्वत:ला तिथेच पुन्हा पुन्हा जखमा करून घेणारं. आता उपचारानंतर मला त्या तडफडणाऱ्या चिमणीसाठी अनेक पर्याय दिसतात. एक म्हणजे आपल्याला खरंच कुठे जायचं आहे? त्या खोलीत? कशासाठी? त्या खोलीची खिडकी बंद असताना वेगळं कुठलं दार दिसतं आहे का? त्यातून आत जाणं कदाचित सुकर असेल.. मी ही खिडकी उघडू शकले तर? उपचारांनी मला अशा अनेक खिडक्या उघडण्याची सजगता दिली आहे. मात्र या सगळ्याला एक दुसरी बाजूही आहे. तीसुद्धा आवर्जून नमूद करावीशी वाटते. मी कुठल्याही नाटक-सिनेमात (आपल्या देशातल्या) मानसोपचाराचा प्रसंग पाहायचे तेव्हा मला वाटायचं हे किती खोटं लिहिलं आहे. मानसोपचार इतका ढोबळ वाटतो का या लेखकांना? नुसतं गोळ्या देणं, शॉक देणं म्हणजे मानसोपचार का? हळूहळू आसपासच्या काही मित्र-मैत्रिणींचे मानसोपचाराचे अनुभव ऐकले आणि थोडी काळजी वाटायला लागली. वाटलं, हे योग्य तज्ज्ञांकडे जात आहेत की नाही?
कुणीसं मानसोपचार क्षेत्रातलंच एके दिवशी मला खेदानं म्हणालं, आपल्या देशात खूप कमी तज्ज्ञांनी ‘काउन्सेलिंगचं व्यवस्थित शिक्षण घेतलेलं असतं. हे फारच गंभीर वाटलं. पुन्हा विचार करताना वाटलं, नाटक सिनेमातल्या त्या तथाकथित लेखकांनी मानसोपचाराविषयी ढोबळ लिहिलं असेल. कारण कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यात त्याच प्रकारचे तज्ज्ञ भेटले असतील. शेवटी जो तो स्वत:च्या अनुभवाचंच लिहितो ना.. (काही अनुभवाशिवाय, अभ्यासशिवाय लिहिणारे सोडले तर; तसेही असतातच! असो!) या सगळ्यानंतर नुसती उपचाराची इच्छा असून, होणार नाही तर योग्य तज्ज्ञ मिळणं किती महत्त्वाचं आहे हे जाणवतं आहे. मानसोपचार क्षेत्रात दर दिवसागणिक झपाटय़ानं क्रांती होते आहे. मी ज्या तज्ज्ञांकडे जाते त्या अजूनही विविध वर्कशॉप्स करून स्वत:ला ‘ज्ञात’ करत राहतात. या क्षेत्रातलं ‘आजचं ज्ञान’ माझ्यापर्यंत पोचवत राहतात, हे फार महत्त्वाचं आहे. हे सगळं आज दाटून येतं आहे. कारण माझ्या जिवाभावाची अनेक माणसं मला ‘भानासकटच्या उतू जाण्याच्या’ प्रदेशात दिसत आहेत. मला ‘त्या’ मोठय़ा माणसानं दाखवला तो मनाच्या शास्त्राचा रस्ता मला त्या सगळ्यांना कसा दाखवता येईल या जाणिवेनं मी अस्वस्थ आहे. या रस्त्यावर चालण्याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. जबरदस्ती नाही करता येत. मला तो रस्ता दाखवणाऱ्या द्रष्टय़ाची आज अनेकांना गरज आहे.
परवाच फोनवर एक संभाषण ऐकलं, माझा एक मित्र दुसऱ्या मित्राला मानसोपचार घेणं कसं निकडीचं आहे ते सांगत होता. तिकडून फोनवर बोलणारा मित्र म्हणाला, ‘आपण कुणासाठी मानसोपचार घ्यायला सांगतो तेव्हा काय सांगत असतो. खरे तर? तुझ्यात काहीतरी कमी आहे असेच सांगत असतो ना?’ त्यावर अलीकडून बोलणारा मित्र शांतपणे म्हणाला, ‘नाही. आपण त्याला सांगत असतो, आय केअर फॉर यू..’ हे ऐकलं आणि तो द्रष्टा कुठल्या ना कुठल्या रूपात आसपास असल्यासारखं वाटलं. माझ्या अनेक जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींना हेच सांगावंसं वाटतं, ‘आपण ताणात आहोत हे मान्य करू या. हा शास्त्राचा रस्ता निवडू या. कारण वी केअर फॉर अवरसेल्फ अँड इच अदर!’    
amr.subhash@gmail.com