देशातील पक्ष्यांच्या १७० प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे व २०१४च्या रेड लिस्टमध्ये आठ नवीन प्रजातींची भर पडली आहे, असे युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने म्हटले आहे. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांमध्ये लाल डोक्याचा ससाणा, हिमालयातील ग्रिफॉन, युनान नुथॅच, अ‍ॅशी हेडेड ग्रीन पीजन, वुली नेकड स्टॉर्क, अंदमान टील, अंदमान ग्रीन पिजन यांचा समावेश आहे.
आयूसीएच्या यादीत अरुणाचल प्रदेशातील बुगुन लिओचिचला हा पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. अधिवासाच्या विनाशामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, त्यामुळे पर्यावरण धोक्यात असल्याचे संकेतही मिळाले आहेत.
आययूसीएनने दिलेला अहवाल बीएनएचएस, बर्डलाइफ इंटरनॅशनल व इतर संघटनांनी सादर केलेल्या माहितीवर आधारित आहे. जगातील पक्ष्यांच्या १३ टक्के प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बर्डलाइफने रेड लिस्टमध्ये १०४२५ पक्ष्यांचा समावेश केला असून, त्यातील १४० प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २१३ जास्त प्रमाणात नष्ट होण्याच्या तर ४१९ नष्ट होण्याच्या व ७४१ प्रजाती धोक्यात आहेत.