काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार बट याच्या एनकाऊन्टरनंतर सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. नुकतेच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घुसखोरांविरोधात कारवाई करत दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते. मात्र केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात २० ते २५ दहशतवादी घुसल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या काही काळात देशात पुन्हा २६/११ सारखा जीवघेणा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा असल्याचे वृत्त समोर आले आहे. सीमेजवळचा प्रदेश आणि देशातील मुख्य शहर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर देशातील सर्व विमानतळं, रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकं, मॉल्स, हॉटेल्स आणि वर्दळीची ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सीमेवर घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात असले तरी या वाढत्या घटना पाहता दहशतवाद्यांमध्ये देशाला अस्थिर करण्यासाठीचा कट शिजला जात असल्याचा अंदाज आहे.

मँचेस्टर आणि जगातील इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी हल्लीच दहशतवादी हल्ल्यांच्या घटना पुढे आल्या आहेत. भारतानेही पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ जारी केला होता. यात २० ते २५ पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी ठार झाले होते. याचा बदला म्हणून देशात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा इरादा असल्याचे समजते.