२२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी रामजस महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याप्रकरणी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे.रामजस महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमादरम्यान अभाविप आणि एआयएसएमध्ये मारामारी झाली. त्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे मानवाधिकार आयोगाने म्हटले. याबाबत पोलीस आयुक्तांना स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. २२ फेब्रुवारी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने आज निषेध मोर्चा काढला.

एसजीटीबी खालसा महाविद्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली होती. दिल्ली विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.  आम्ही येथे एका विशिष्ट विचारधारेला समर्थन किंवा विरोध करण्यासाठी आलो नसून हिंसाचाराला महाविद्यालयापासून दूर ठेवा ही मागणी करण्यासाठी आलो आहोत असे ते म्हणाले.  या मोर्चाची सांगता नेत्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भाषणाने झाली.

अभाविपला ही लढाई विचारांनी जिंकता येत नाहीये त्यामुळे ते आता हिंसेचा वापर करत आहेत असे सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले.  योगेंद्र यादव हे देखील या मोर्चाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपण पूर्णपणे साथ देऊ असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये हिंसेला स्थान असता कामा नये असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील या मोर्चाविषयी आपले विचार प्रकट केले. ही लोकशाही आहे. जे लोक आपल्याविरोधात बोलतात ते आपले शत्रू नाहीत. त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचा पूर्ण अधिकार आहे असे ते म्हणाले.  दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनी एक पत्रकार परिषद घेतली. सर्व डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना देशविघातक कृत्ये करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्ली विद्यापीठाचे वातावरण खराब करण्यास डाव्या विचारांच्या संघटना जबाबादार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. एआयएसएला देशविरोधी चर्चासत्रांचे आयोजन करायचे असते त्यातून हा वाद निर्माण झाला असे त्यांनी म्हटले.