शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमानप्रवास करण्याची बंदी एअर इंडियाने मागे घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या स्टाफला मारहाण केल्यामुळे खासदार गायकवाड यांच्यावर एअर इंडियाने विमानप्रवास बंदी घातली होती. एअर इंडियाचा कित्ता गिरवत बाकी एअरलाईन्सने रविंद्र गायकवाडांना आपल्या विमानातून प्रवास केला जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना केल्वेने प्रवास करण्याची वेळही आली होती.

 

खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवासबंदीवरून शिवसेना आक्रमक झाली होती. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेने आता सरकारलाच थेट इशारा दिला होता. येत्या १० एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर तोडगा काढला नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेने दिला होता. शिवसेनेच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने ‘टार्गेट’ केले जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलात्कारी, दहशतवादी, इतकेच काय तर काश्मिरी फुटीरतावादीही विमानाने प्रवास करू शकतात; मग गायकवाड का नाही, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याचेही राऊत यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामागे कोण आहे, हे लवकरच आम्ही जगासमोर आणू, असेही त्यांनी सांगितले. विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतीला या विमान कंपन्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देतात, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला.