दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात(जेएनयू) एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांवर योग्य कडक कारवाई केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.  देशविरोधी घोषणाबाजी करून देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱयांना कदापिही माफ केले जाणार नाही, अशा कडक शब्दात राजनाथ यांनी ‘जेएनयू’मध्ये घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकरणाचा निषेध व्यक्त केला. या देशातील कोणताही नागरिक भारत मातेचा अपमान सहन करू शकत नाही. राष्ट्रविरोधी वक्तव्या करणाऱयांवर कारवाई व्हायलाच हवी, असे मत इराणी यांनी व्यक्त केले.
मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी दहशतवादी अफजल गुरु आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सह-संस्थापक मकबूल भटच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. २०१३ साली अफजल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केली होती.