रॉयल एनफिल्ड किंवा बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाजने एक नवी बाइक लाँच केली आहे. द डॉमीनर असे या बाइकचे नाव असून ही नवी बाइक आमचा फ्लॅगशिप ब्रॅंड ठरेल असा विश्वास बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केला आहे.

द डॉमिनरला ३७३ सीसीचे पावरफुल इंजिन आहे. डिस्क ब्रेक असलेल्या या बाइकची किंमत १.३६ लाख ते १.५ लाख दरम्यान असेल.

एक ते दोन लाख किंमत असणाऱ्या बाइकमध्ये बाजाराचा सर्वाधिक जास्त हिस्सा रॉयल एनफिल्डने व्यापलेला आहे. बाजारातील त्यांचा हिस्सा हा ८० टक्के आहे. आम्ही सध्या केवळ २० टक्के ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे बजाज यांनी म्हटले. जर आम्ही आमचे उद्दिष्ट गाठले तर एक ते दीड वर्षात ‘बिलियन डॉलर’ ब्रॅंड ठरू असे ते म्हणाले.

एका महिन्यात रॉयल एनफिल्ड त्यांच्या ६५,००० ते ७०,००० गाड्यांची विक्री करते. २०१७ मध्ये ते जवळपास १० लाख गाड्यांची विक्री करतील. तर, आम्ही सुरुवातीला १०,००० गाड्यांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हळुहळु हे उद्दिष्ट वाढवून वर्षाला २ लाख बाइक्स विकण्याचा आमचा मानस आहे असे बजाज यांनी सांगितले. बाइकची विदेशातही निर्यात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आजपासून या बाइकच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली आहे. लॅटीन अमेरिका, फिलीपीन्स, मलेशिया आणि काही युरोपियन देशात या गाडीची निर्यात होईल.

या गाडीची वैशिष्ट्ये
-इंजिन क्षमता – ३७३ सीसी

-मॅक्जिमम पावर – ३७ बीएचपी @८,००० आरपीएम

– मायलेज – २७ किमी प्रती लीटर

-स्टार्टिंग – इलेक्ट्रिक

-गियर्स – ६

-वजन – १८२ किलो

-किंमत – १,३६,००० रु. ( दिल्ली एक्स शो रुम प्राइज)