आयसिसशी संबंधित जिहादी गटांनी सीरियाची राजवट असलेल्या दोन ठिकाणी केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात किमान १०१ जण ठार झाले आहेत. यापैकी ५३ जण जबलेह शहरात, तर अन्य ४८ जण तारतूस शहरात करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाले आहेत. हा अत्यंत संहारक हल्ला असल्याचे सीरियाचे मानवी हक्क प्रमुख रामी अब्देल रेहमान यांनी म्हटले आहे.

आयसिसशी संबंधित अमाकने हा हल्ला केल्याचा दावा आयसिसने केला आहे. तारतूस आणि जबलेह येथे आयसिसने हल्ले केल्याचे म्हटले आहे. सोमवारी सकाळी जबलेह आणि तारतूस येथे एकाच वेळी सात आत्मघातकी हल्ले करण्यात आले. त्यामध्ये एकूण ७८ जण ठार झाल्याचे सीरियातील माध्यमांनी म्हटले आहे. टेलिव्हिजनने एका बस स्थानकावर झालेल्या हल्ल्याचे फुटेज दाखविले. या स्फोटात अनेक मिनी बसगाडय़ा छिन्नविछिन्न झाल्याचे दिसत होते.

सदर दोन्ही शहरांत अध्यक्ष बाशर अल-असाद यांचे वर्चस्व असून जबलेहपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या करदाहा हे त्यांच्या कुटुंबीयांचे मूळ गाव आहे.