दिल्लीत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या बवाना मतदारसंघातील आमदार वेद प्रकाश यांनी सतिश यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप राज्यपाल यांच्यावर टीका करणे हाच केजरीवालांचा सध्याचा एककलमी कार्यक्रम आहे. ते काम अर्धवटच सोडून देतात आणि मग केंद्र सरकारवर खापर फोडतात, २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात ‘आप’ला अपयश आले आहे. अरविंद केजरीवाल हे नाकर्ते आणि केवळ बाता मारणाऱ्यांच्या गराड्यात सापडले आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत वेद प्रकाश यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी त्यांनी आपण आमदारकी आणि सरकारी संस्थांवरील पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. वेद प्रकाश यांच्या प्रवेशाने भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब , उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश याठिकाणी भाजपने विरोधी पक्षातील ताकदवान उमेदवारांना गळाला लावून निवडणुकीत लक्षणीय मिळवून दाखवले आहे. त्यामुळे आता दिल्लीतही भाजप हाच कित्ता गिरवणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘आप’मध्ये माझी घुसमट सुरू होती. आपला विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. आपमध्ये सध्याच्या घडीला पक्षनेतृत्त्वावर नाराज असलेले तब्बल ३५ आमदार असल्याचेही वेद प्रकाश यांनी म्हटले.गेल्या दोन वर्षात बवाना मतदारसंघात ‘आप’ सरकारने कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. ‘आप’ सरकार आणि लोकांमध्ये तुटलेपण असल्यामुळे सरकारला त्यांच्या समस्या समजत नसल्याची टीकाही वेद प्रकाश यांनी केली. २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत वेद प्रकाश बवाना मतदारसंघातून ५१ हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. वेद प्रकाश यांनी विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

दिल्लीतील महापालिका निवडणुकांसाठी इव्हीएमचा वापर केला जाऊ नये अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी केली होती. पण श्रीवास्तव यांनी असे होणार नसल्याचे स्पष्ट केले. दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक २२ एप्रिल रोजी होणार असून २५ एप्रिलला निकाल लागणार आहेत.