१९८४ मध्ये शीख विरोधी दंगलींच्यावेळी कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरले होते. तसेच, वरिष्ठ पोलिस अधिकारी व सरकार यांचे शिखांना धडा शिकवण्याबाबत साटेलोटे होते हे दाखवून देणारे स्टिंग ऑपरेशन एका वृत्तसंकेत स्थळाने केले आहे.  कोब्रापोस्टच्या चाप्टर ८४ या स्टिंग ऑपरेशनमध्ये असे दाखवले आहे की, दिल्ली पोलीस अधिकारी शीखविरोधी दंगलीत कारवाई करण्यात अपयश आल्याची कबुली देत आहेत. त्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते.
कोब्रापोस्टने कल्याणपुरीचे स्टेशन हाऊस ऑफिसर शूरवीर सिंग, दिल्ली कॅन्टोन्मेंटचे स्टेशन हाऊस ऑफिसर रोहतस सिंग, कृष्णनगरचे स्टेशन हाऊस ऑफिसर  एस.एन भास्कर , श्रीनिवासपुरीचे स्टेशन हाऊस ऑफिसर ओ.पी.यादव, मेहरौलीचे स्टेशन हाऊस ऑफिसर जयपाल सिंग यांच्यातील संभाषण टिपले आहे.
कोब्रापोस्टचा दावा
कोब्रापोस्टने असा दावा केला आहे की, पोलीस प्रमुख एस.सी.टंडन यांनी सोईस्कररीत्या प्रश्न टाळले, तर अतिरिक्त पोलीस आयुक्त गौतम कौल यांनी दंगलीची कल्पना असल्याबाबत सरळ नकार दिला. शीखविरोधी दंगलीच्या सूचनांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. जाळपोळ व दंगलीच्या दोन टक्के संदेशांची नोंदणी करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांच्या नोंदीतील तपशील सोईस्कररीत्या बदलण्यात आला.काही पोलीस अधिकाऱ्यांनी दंगलीतील मृतांची संख्या कमी दाखवण्यासाठी मृतदेह भलतीकडेच गाडून टाकले. पोलिसांनी दंगलखोरांविरूद्ध कारवाई करू नये असे सांगत इंदिरा गांधी झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
दंगलीची दृश्ये
सरकारने पोलिसांनी कारवाई करू दिली नाही व पोलीसच कारवाई करीत नसल्याचे भासवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिखांना धडा शिकवण्यासाठी सरकारशी साटेलोटे केले होते. एक वर्षभर हे स्टिंग ऑपरेशन चालू होते. त्यातील बहुतेक चित्रण गेल्या दोन महिन्यातील आहे. इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाल्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या, त्याची दृश्ये पाश्र्वभूमीला आहेत.
ज्या पोलिसांच्या काळात दंगली, जाळपोळ व खुनाचे प्रकार झाले त्यांच्याकडून आम्ही तेव्हाची स्थिती जाणून घेतली, असे कोब्रापोस्टचे संपादक अनिरूद्ध बहल यांनी सांगितले. पटेलनगरचे पोलीस अधिकारी अमरिक सिंग भुल्लर यांचे नाव स्थानिक नेत्यांनी प्रतिज्ञापत्रात घेतले असून त्यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप केला आहे. कल्याणपुरी या ठिकाणी ५००-६०० शिखांचे हत्याकांड झाले होते.
 तक्रार दाखल करण्यास पोलिसांची मनाई
बहल यांच्या दाव्यानुसार अनेक दंगलग्रस्तांना तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी मनाई केली. काही ठिकाणी एकत्र नोंदी करून त्याची तीव्रता कमी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना दंगेखोरांवर गोळीबार करण्यापासून रोखले. अग्निशमन दल जाळपोळीच्या भागात पाठवण्यात आले नाही.
कोब्रापोस्टने माजी पोलीस आयुक्त एस.सी. टंडन यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी पोलीस दलाचे नेतृत्वच केले नाही हे दाखवून दिले. सरकारच्या प्रभावाखाली टंडन यांनी काम केल्याचा आरोप त्यावेळचे दुसरे अधिकारी त्यागी यांनी केला.
 ते म्हणाले,‘‘ तो जाने अनजाने में वो गव्हर्नमेंट के इन्फ्लुएंस में रहे हैं की उन्होने मिसमॅनेज किया, शुरू मे और दो दिन जब असल मे बात हाथ से निकल गयी.’’ यादव यांनी टंडन यांच्यावर आरोप करताना सांगितले, की त्यांनी आमचे नेतृत्व केले नाही. तर भास्कर यांनी सांगितले की, एखाद्या स्टेशन हाऊस ऑफिसरवर आरोप करण्यापेक्षा पोलीसप्रमुखांवर कारवाई व्हायला हवी होती.

‘दंगलीत रा.स्व.संघ, वाजपेयी यांच्या निवडणूक एजंटचा हात’
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत रा.स्व.संघ, भाजप व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निवडणूक एजंट यांची नावे काँग्रेसने ओढली असून, भाजप-शिरोमणी अकाली दल युतीने या मुद्दय़ावर लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी राजकीयीकरण केले आहे असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेस कार्यकर्त्यांशिवाय भाजप, रा.स्व.संघ व वाजपेयी यांचे निवडणूक एजंट यांचा या दंगलीत हात होता, त्यांचीही चौकशी करण्यात आली. काहींना शिक्षा झाली तर काहींची सुनावणी सुरू  आहे. १९८४ दंगल हा अमानुष प्रकार होता. पंतप्रधान मनमोहन सिंग व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्याबाबत संताप व दु:ख व्यक्त केले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सूरजेवाला यांनी सांगितले. भाजपचे नेते अरुण जेटली व अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांची सून सीमरनजित कौर हे पराभवाच्या छायेत आहेत, त्यामुळे त्यांनी शीख दंगलीचा मुद्दा उकरून काढला आहे, पण पंजाबचे लोक या सापळय़ात अडकणार नाहीत असे ते म्हणाले.