दिल्लीत गेल्या वर्षी १६ डिसेंबरला तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला आज शनिवार ज्युवेनाईल न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविली आहे.
या आरोपीवर बलात्काराचा आणि हत्येचा गुन्हा सि्दध झाला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार त्याला तीन वर्षांसाठी सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी ज्युवेनाईल न्यायालयाला शिक्षा सुनाविण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार त्या अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात इतर आरोपींवर सुनावणी सुरू असल्याने ज्युवेनाईल न्यायालयाकडून अल्पवयीन आरोपीची सुनावणी सतत लांबणीवर टाकण्यात येत होती. अखेर सर्वाच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ज्युवेनाईल न्यायालयास निर्णय देण्याची परवानगी दिल्याने आज ‘त्या’ अल्पवयीन आरोपीला आज शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
तरी सुनाविण्यात आलेली शिक्षा कमी असल्याचे सांगत, त्या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आरोपीला केवळ तीन वर्षांची शिक्षा होते. हे योग्य नसल्याची भावना पीडितेच्या कुटुंबियांनी व्यक्त करत, न्यायालयाने दिलेल्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
निकाल दिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी आरोपीला आणखी कमी शिक्षा झाली असल्याचे म्हणत न्यायालयाबाहेर निर्णयाच्या विरोधात निदर्शने केली.