अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ‘फोन पे चर्चा’ करणार आहेत. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असून या दोघांमध्ये आता नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच भाषणात अमेरिका फर्स्टचा नारा दिला आहे. परदेशातील तरुणांनी हिरावून घेतलेला रोजगार अमेरिकेतील तरुणांना पुन्हा मिळवून देऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात काय चर्चा होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये दुरध्वनीद्वारे चर्चा होईल.

ट्रम्प हे अमेरिकेतील उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहेत. यामुळे चीनला हादरा बसेल अशी शक्यता आहे. याशिवाय आयटी क्षेत्रावरही याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. कौशल्य रोजगाराच्या संधी अमेरिकी लोकांना दिल्या जातील असे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. भारतीय आयटी कंपन्यांना या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास फटका बसू शकतो. अमेरिकेत २०१५ मध्ये १,७२,७४८ जणांना एच १ बी व्हिसा दिला होता. त्यात सर्वाधिक भारतीय होते. टीसीएस, इन्फोसिस, विप्रोच्या अनेक कर्मचाऱ्यांना व्हिसा दिला होता. कॉग्निझंट सारख्या भारतात काम करणाऱ्या कंपन्यांनी कमी वेतनात काम करणाऱ्या भारतीयांना व्हिसा देऊन अमेरिकेत पाठवले होते. त्यामुळे ट्रम्प यांनी कडक धोरण ठेवले तर भारतीयांची संधी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय ओबामा केअर मोडीत काढण्याच्या धोरणामुळे भारतीय औषध उद्योगाला फटका बसेल कारण भारत हा अमेरिकेला औषधे निर्यात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेत निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले होते. तर मोदींनीही निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ट्रम्प यांचे अभिनंदन केले होते.