शस्त्र बाळगण्याचा परवाना (लायसन्स) मिळत नाही, म्हणून उत्तर प्रदेशमधील एका मुस्लिम तरुणाने धर्मांतर करून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. फुरकान अहमद असे या तरुणाचे नाव असून, त्याने धर्मांतरानंतर डोक्यावरील केस काढत शेंडी ठेवली आहे. त्याचबरोबर कपाळावर टिळाही लावला. त्याने स्वतःचे नावही बदलून फूल सिंग ठेवल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. ‘स्क्रोल डॉट इन’ या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.
अहमद हा उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ई-रिक्षा चालक म्हणून काम करतो. बाघपतमध्ये त्याने शस्त्र बाळगण्याचा परवान्यासाठी अर्ज केला होता. पण त्याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला. सहा वर्षे तो यासाठी प्रयत्न करत होता. पण त्याच्या पदरी सातत्याने निराशाच येत होती. आपण मुस्लिम असल्यामुळेच आपल्याला शस्त्र बाळगण्याचा परवाना नाकारण्यात येत असल्याचे अहमद याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून केला जाणारा धार्मिक भेदभाव उघड करण्यासाठीच आपण हिंदू धर्मात धर्मांतर केल्याचे त्याचे म्हणणे आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मुस्लिमांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळाला तर आपण सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू शकतो. ज्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालू शकतो, असेही अहमद याने म्हटले आहे.