हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल लि. (एजेएल) यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हरयाणा राज्य दक्षता आयोगाने यावर्षीच्या मे महिन्यात दाखल केलेल्या एका एफआयआरची दखल घेऊन सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) हा फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. एजेएल कंपनीला पंचकुला येथे कथितरीत्या एकच भूखंड पुन्हा वितरित केल्याबद्दल भूपिंदरसिंग हुडा आणि हरयाणा नगरविकास प्राधिकरणाच्या (हुडा) ४ अधिकाऱ्यांविरुद्ध दक्षता आयोगाने फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

सक्तवसुली संचालनालयाच्या एफआयआरमध्ये आरोपी करण्यात आलेल्या लोकांच्या नावाने लवकरच समन्स जारी करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपण काहीही चुकीचे केलेले नसून आपल्याविरुद्ध ‘राजकीय सुडापोटी’ ही कारवाई करण्यात आल्याचे हुडा यांनी म्हटले आहे.

दक्षता आयोगातर्फे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्य़ात जनसेवकामार्फत फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात, फसवणूक, गुन्हेगारी कट, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश आहे. मुख्यमंत्री या नात्याने हरयाणा नगरविकास प्राधिकरणाचे तत्कालीन पदसिद्ध अध्यक्ष असलेले भूपिंदरसिंग हुडा यांच्यासह ‘हुडा’च्या चार वरिष्ठ  अधिकाऱ्यांविरुद्ध गेल्या ५ मेला हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.