फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्ग याने अमेरिकेच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेनंतर पोस्टद्वारे ‘मन की बात’ केली आहे. आपण २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट संकेत देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या पोस्टद्वारे त्यानं आपली पुढील रणनिती स्पष्ट केली आहे.

मार्क झकरबर्ग सध्या जगभरातील अनेक ठिकाणी भेटी देत आहे. यावरून तो राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चेला त्यानं पोस्टद्वारे पूर्णविराम दिला आहे. राजकारणात प्रवेश करण्यासाठी सध्या अनेक ठिकाणचे दौरे करत असल्याची चर्चा काही लोक करत आहेत. पण त्यामागे नवीन लोकांच्या भेटी घेऊन त्यांचं आयुष्य समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे, असं त्यानं पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तीचे विचार वेगवेगळे असतात. मी त्या लोकांची भेट घेऊन संस्कृती समजून घेणार आहे. तसेच समानतेचा शोध घेणार आहे. त्यातून फेसबुकमध्ये बदल करण्यात येतील. त्यामुळे अधिकाधिक लोक फेसबुकशी जोडले जातील, असं झकरबर्गचं म्हणणं आहे.

आपल्या जीवनात नात्यांना अधिक महत्त्व आहे, असं मला आतापर्यंतच्या प्रवासात दिसून आलंय. आपण शक्यतांकडे कसे पाहतो, सूचनांचा प्रसार कसा करतो अथवा आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या कशा सोडवतो, हे बहुतांश आपल्या नात्यांवर अवलंबून आहे, असं निदर्शनास आलं आहे. जीवनातील असमानता संपुष्टात आणून चांगलं विश्व निर्माण करू शकतो, असंही त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लोकांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी घेऊन त्यांना अधिक समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं मी जगभर फिरून तेथील लोक आणि संस्कृती जाणून घेणार आहे, असंही त्यानं म्हटलं.